एकच दिवशी १२५ घरे, टपऱ्या, हाॅटेल, दुकाने भुईसपाट
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७: कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या स्टेशन रोडवरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसीबी फिरवून अतिक्रमणात असलेले दुकानं, पञ्यांसह कच्ची पक्की घरे, दुकाने, टपऱ्या तसेच दारुच्या अड्ड्यांवर जेसीबी फिरवून १२५ अतिक्रमणे भूईसपाट केल्याने स्टेशन रोडच्या शेजारचा परिसर मोकळा झाला आहे.
याबाबत कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता वृषभ शिंदे यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी रस्त्याला अगदी खेटून घरे, दुकाने व टपऱ्या थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासुन १५ मिटर अंतरा पर्यंत कोणालाही बांधकाम किंवा अतिक्रमण करता येत नाही माञ साईबाबा तपोभूमी ते कोपरगाव रेल्वेस्टेशन या दरम्यान १२५ अतिक्रमण धारकांनी रस्त्याला अडथळा होईल असे अतिक्रमण केले होते.
अतिक्रमण काढण्यासाठी आपण गेल्या अनेक महिन्यांपासून नोटीसा वर नोटीसा देवूनही कोणीच अतिक्रमण न काढल्याने अखेर बुधवारी सकाळी दहा वाजता कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली.
तीन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतची अतिक्रमण जमीनदोस्त होत असल्याचे दिसताच अनेकांनी स्वता: होवून अतिक्रमणे काढून लागले. काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी विनंती करुन वेळ मागत होते. माञ शासनाच्या निर्णयानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याने संपूर्ण अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. या मोहिमेत ४ पोलीस अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी यांचा कडेकोट बंदोबस्त होता तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे १५ कर्मचारी सहभागी होते.
दरम्यान डोक्यावर सुर्य आग ओकत होता. उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती, तर तळपत्या उन्हात शासकीय अधिकारी घरावर जेसीबी फिरवून घर उध्वस्त करत होती. घरातील लहान मुलांना आवरायचं की, उघड्या घरातलं सामान सावरायचं हे अनेक गरीब महिलांना समजत नव्हते. काहींच्या डोळ्यातून अश्रू आणि अंगातुन घामाच्या धारा एकाचवेळी वाहत होत्या. सकाळ पासुन उपासपोटी अनेकजण सैरभैर झाली होती.
अशातच सुर्यतेज संस्थेचे प्रमुख सुशांत घोडके यांना गरीब अतिक्रमधारकांची अर्थात झोपडीत राहणाऱ्यांची दैनिक अवस्था लक्षात आली. घरे उध्वस्त झाल्याने त्यांच्या मुलाबाळांना खाण्यासाठी अन्नाचा कण नव्हता. घोडके यांनी भर उन्हात या भुकेलेल्या ना खिचडी भात देवून दिलासा दिला. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते व घोडके यांनी प्रत्येकांनी आस्थेने खिचडी घालू घातली. घोडके यांच्या कार्याचे सर्वञ कौतूक होत आहे.
स्टेशन रोडच्या कडेला १५ मीटरच्या नियमांचे उल्लंघन करुन पक्के बांधकाम ज्या ज्या धनिकांनी बांधले त्यांचेही बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जमीनदोस्त करतील का?. असा सवाल नागरीकामधुन विचारला जातोय.सार्वजनिक बांधकाम विभागाची मोजपट्टी त्यांच्या बांधकामापर्यंत जाईल का?