शिवकालीन इतिहासाचा वारसा जोपासण्याचा संजीवनी युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम – स्नेहलताताई कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ७ : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे आदर्श आहेत. शिवराज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व व प्रेरणादायी इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करून संजीवनी युवा प्रतिष्ठानने स्तुत्य उपक्रम राबविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची शिकवण आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून, शिवरायांच्या समाजोद्धारक विचारांचा वारसा व शिवकालीन इतिहास जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

Mypage

अखंड भारताचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी (६ जून) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आयोजित केलेल्या शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

Mypage

प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी प्रदर्शनातील शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

यावेळी कोल्हे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मां साहेब यांच्या प्रेरणेने परकीय अत्याचारी संकटांपासून मुक्त करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. राज्य चालवायचे ते रयतेसाठी, रयतेच्या उन्नतीसाठी हा आदर्श त्यांनी जगाला घालून दिला. संघर्षातून व त्यागातून रयतेचे लोककल्याणकारी राज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे पुरस्कर्ते, आदर्श नीतिवंत राजे होते. त्यांचे कर्तृत्व, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात. छत्रपती शिवरायांची शिकवण आचरणात आणून प्रत्येकाने त्यांचा आदर्श जोपासून वाटचाल करण्याची गरज आहे.

Mypage

शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला व एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. त्यामुळे कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्य पसरले. साडेतीनशे वर्षांपूर्वी पार पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा व क्रांतिकारी प्रसंग होता. राज्याभिषेकाच्या वेळीच शिवाजी महाराजांनी ‘छत्रपती’ हे पद धारण केले. त्यावेळी आपल्या लाडक्या शिवाजी राजाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी असंख्य जनता किल्ले रायगडावर उपस्थित होती. रायगडावर आलेल्या प्रत्येकासाठी जणू शिवराज्याभिषेक सोहळा हा जणू दसरा-दिवाळीच्या उत्सवासारखाच होता. 

Mypage

छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन शक सुरू केला. स्वराज्यात अधिकृतरित्या शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक करून अनेक सरदार व मंत्री यांना स्वराज्याची कामे व जबाबदाऱ्या वाटून दिल्या. आज या सोहळ्यास ३४९ वर्षे पूर्ण झाली असून, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशाल आरती होणार असून, देशभरातील पवित्र नदयांच्या पाण्याने शिवाजी महाराजांना जलाभिषेक करण्यात येणार आहे. ही कोपरगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

Mypage

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी कधीही जातिभेद केला नाही. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांचे स्वराज्य, सुशासन आणि समृद्धीच्या महान गाथा आजही आपणा सर्वांना प्रेरणा देतात. राष्ट्राचे कल्याण व लोककल्याण ही शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेची मूलभूत तत्त्वे होती. त्यांनी गुलामगिरीची मानसिकता संपवून लोकांना राष्ट्र निर्माणासाठी प्रेरित केले, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.

Mypage

शिवकाळात मराठा सैनिकांनी वापरलेले शस्त्र आजही आम्हांसाठी एका अस्मितेपेक्षा जास्त आहेत. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या संकल्पनेतून संजीवनी साखर कारखान्याने गड, कोट, किल्ले यांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन १९७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या दिवशी १२ जूनला कोपरगावात भरविले होते. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज कोपरगावकरांसाठी शिवकालीन शस्त्रे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली. हा प्राचीन गौरवशाली इतिहासाचा वारसा जोपासण्यासाठी हे युवक झटत आहेत. त्यांची ही धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार स्नेहलताताई कोल्हे यांनी काढले.

Mypage

शिवाजी महाराजांनी एकीकडे आक्रमणकर्त्यांपासून आपल्या राज्याचे व संस्कृतीचे रक्षण केले, तर दुसरीकडे राष्ट्र उभारणीसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन समोर ठेवला. त्यांनी स्वराज्य मिळविताना किल्ले, युध्द करण्याच्या पध्दतीबरोबरच शस्त्रास्त्रांमध्येही आमूलाग्र बदल केले. केवळ तलवार, भाले, पटटा यापलिकडेही अनेक शस्त्रे मराठयांनी मोठ्या प्रमाणात वापरले. शिवकाळात सर्वात जास्त प्रमाणात सुधारणा झालेले शस्त्र म्हणजे तलवार. या तलवारी आजही ‘मराठा तलवारी’ म्हणून प्रसिध्द आहेत. छत्रपती शिवरायांनी वापरलेली भवानी (जगदंबा) तलवार आणि तिचा इतिहास हा आजही प्रेरणादायी व अभ्यासपूर्ण आहे, असेही कोल्हे म्हणाल्या.