वारीतील बाबाजी भक्त परिवाकडून शिवनेरी किल्ल्याची स्वच्छता

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील वारी येथील जय बाबाजी भक्त परिवार, राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट व वारी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शंभरपेक्षा जास्त स्वच्छता दूतांनी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला व श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात नुकतेच १२ तास मोठ्या उत्साहात महाश्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियानाची सुरुवात श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते करण्यात आली.

         कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सरोवर येथे देव- देश-धर्मासाठी तब्बल सव्वा कोटी तास श्रमदानाचा महासंकल्प केला होता. त्यानुसार सव्वा कोटी तास महाश्रमदानाचे संकल्पपूर्तीकडे जय बाबाजी भक्त परिवाराची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यानुसार देशभरातील ५०० ठिकाणी एकाच दिवशी १० लाख तास श्रमदान करण्यात आले.

त्यात महाराष्ट्रासह १८ राज्यातील धार्मिक ठिकाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गडकिल्यांवर परिश्रमपूर्वक महाश्रमदान करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी १ श्रमदान प्रमुख व १०० श्रमदान सेवक अशा प्रकारची रचना श्रमदान करतांना करण्यात आली होती. यानुसार गेल्या वर्षभरापासून वारीतील तीनही संस्थामार्फत एकत्रित आठवड्यातील प्रत्येक रविवारी महाश्रमदान व स्वच्छता अभियान अखंडितपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाचे आतापर्यंत ६७ आठवडे पूर्ण झाले आहेत.

   वारीतील जय बाबाजी भक्त परिवाराचे अभियान प्रमुख भाऊसाहेब टेके यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात श्री लेण्याद्री परिसर, मंदिर परीसर, दर्शन मार्ग, वाहनतळ, लेण्याद्री फाटा ते लेण्याद्री पायथा रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणासह शिवनेरी किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. या अभियानात वारी गावातील सर्वच वयोगटातील सुमारे १०० पेक्षा जास्त स्वच्छतादूत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या अभियानात मोठ्या संख्येत प्लास्टिक बाटल्या संकलित करण्यात आला.