कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६: कोपरगाव तालुक्यात पोलीसांच्या कृपेने अवैध व्यवसायीकांनी चांदी होत असुन सर्वसामान्य नागरिकांची लुट होत आहे. चोरांचा सुळसुळाट, अवैध धंद्यांचा खुले आम बाजार सुरु आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी परिसरात कल्याण-मुंबई मटक्या बरोबर बिंगो चक्रीने व्यवसायात पदार्पण केल्याने आठ घंटे उद्योग समुहात रोजदांरी मध्ये काबाडकष्ट करुन कमावलेला पैसा तरुणाई जुगार मटक्या वर उडवत असल्याने अनेकांचे प्रपंच धुळीस मिळुन जुगारात पैसे हारलेली तरुणाई नैराश्याने व्यसनाधीन होत असल्याचे चित्र परिसरात वाढु लागले आहे.
सुरेगाव – कोळपेवाडी परिसरात अवैध धंद्यानी पोलीसांच्या आशिर्वादाने चांगलेच बस्तान बसवले असुन कल्याण – मुंबई मटक्या बरोबर बिंगो चक्रीने परिसरात पदार्पण केल्याने तरुणाई आर्थिक द्रुष्टीने कंगाल होवुन व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे प्रपंच धुळीस मिळत आहे. सुरेगाव गोदावरी उजवा कँनाल लगत श्रीराम चौक ते शनिमंदिर पुल हा परिसर अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे.
कल्याण – मुंबई, श्रीदेवी, मिलन डे, मिलन नाईट, टाईम बाजार मटक्यास एक रुपयास नव्वदचा भाव देणारा मटका, हारजित, तिर्रट, रमी, मन्ना पत्ता, पत्याचे क्लब आरोग्यासाठी अपायकारक भेसळ युक्त ताडीच्या सेवनाने अनेकांना डोळ्याचे आजार होवून हाडे ठिसूळ होत असल्याचे ताडी सेवन करणाराची तक्रार ना अन्न औषध प्रशासन घेते ना उत्पादन शुल्क विभाग मात्र दररोज शेकडो लिटर ताडी प्लास्टिक फुग्या द्वारे बेकायदेशीर विक्री जोरात होत असते.
ताडी परवाना मिळवण्यासाठी जमिनीच्या सातबारा वर एक हजार सिंधीची झाडे लागवड नोंद असावी लागते तेव्हा उत्पादन शुल्क विभाग परवाना देते, मात्र परिसरात हि झाडे कुठेच आढळुन येत नाही. दर पाच मिनिटांला दहा रुपयात बारा घराला एकशे दहा रुपये देणाऱ्या बिंगो चक्री लाँटरी भोवती तरुणांईचा गराडा असतो. भिंगरी. देशी दारु नवसागर गुळा पासुन तयार होणारी हातभट्टीची गावठी दारू असे अनेक अवैध व्यवसाय पोलिसांच्या कृपा द्रुष्टीमुळे राजरोसपणे चालु आहेत. अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढुन शेकडो दुकान फोडिच्या घटना घडलेल्या आहेत, पोलिसांना अद्याप मुद्देमाल आणि चोर सापडला नाही.
कोळपेवाडी महेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली पोलीस कारभारा विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असतांना पोलिसांनी आठ दिवसांत चोरीचा तपास लावु या आश्वासनाला तिन महिने उलटुन गेले तरी अद्याप चोराचा तपास लागलेला नाही. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना देत वरिष्ठांच्या कारवाईत अवैध धंदे आढळल्यास ठाणे प्रमुखांना जबाबदार धरले जाईल अशी तंबी दिलेली असतांना तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे कुणाच्या कृपा आशिर्वादाने चालू आहेत हे सांगणे नको! पोलीस अधिक्षकाच्या अधिपत्याखाली संमातर तपास व गुन्हा दाखल करण्याचे अधिकार असणारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेस या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नसल्याने बहुधा कारवाई होत नसावी असा ग्रामस्थांचा सवाल आहे.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना छोट्या बाबी त्वरीत दिसतात. मग तालुक्यात अवैध व्यवसाय चालु असल्याचे का दिसत नाही असा सवाल नागरिक करीत आहेत. गुन्हेगारीचे कौतूक आणि सर्व सामान्यांची फजीती असा नवा फंडा तर सुरु होत नाही ना अशीही चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.