शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दरी निर्माण झाल्याने राष्ट्रवादी पक्षाची फाळणी झाली. सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून आपल्या नव्या पक्षाची, राष्ट्रवादीची घोषणा केली त्यावेळी लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील बोधेगावी एका कार्यक्रमात होते. तेव्हा त्यांनी लगेच त्या कार्यक्रमातच, ‘राज्यातील कोणी कोठेही जावोत. आपण शरद पवार यांचे बरोबर असल्याची भूमिका जाहीर करून राष्ट्रवादीची पताका सर्व प्रथम खांद्यावर घेऊन ती अखेर पर्यत जपली. याबाबत परिसराला व घुले बंधूना आजही सार्थ अभिमान आहे. मात्र आज राष्ट्रवादीची
चुलत्या पुतण्यात विभागणी झाल्यावर घुले बंधूच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष असतांना देखील त्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.
तसेच अधिकृत पक्ष फुटी नंतर दोन्ही पवारांनी राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार, खासदार तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व आपापल्या समर्थकांना बुधवार दिनांक ५ जुलैला मुंबई येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र या बैठकीसाठी शेवगावातील राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे हेच फक्त उपस्थित होते. घुले बंधूनी अद्यापआपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि बैठकीला ही गेले नाहीत. याविषयी येथे चर्चेला उत आला आहे.
दरम्यान माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या असून त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत येथे साशंकता व्यक्त केली जात असल्याने
याबाबत त्यांचे बरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. नरेंद्र पाटील घुले व माजी आमदार जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. तालुक्यातील बहुसंख्या ग्रामपंचायती, सेवा सहकारी संस्था तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ यासह बहुतेक सहकारी संस्थावर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.
त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये घुले बंधूच्या राजकीय भूमिकेबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे . याबाबत माजी आ. डॉ. नरेंद्र पाटील घुले यांचेसी सपर्क साधला असता त्यांनी ही आपली भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येईल असा खुलासा केला.
घुले बंधूची, तीच आमची भूमिका
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांचेसी संपर्क साधला असता घुले बंधू लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करतील. घुले बंधू आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची जी भूमिका असेल ती कार्यकर्त्यांना मान्य राहील.
संजय कोळगे,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष