कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ :- दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी कोपरगाव ते श्री क्षेत्र वणी सप्तश्रुंगी गडावर श्री सप्तशृंगी पालखी सोहळयाचे आयोजन करून भाविकांना आई भगवतीचे दर्शन घडविण्यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या राजमुद्रा प्रतिष्ठानचे कौतुक करीत राजमुद्रा प्रतिष्ठानने धार्मिक परंपरा जपली असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्यानिमित्त धर्मभूषण एकनाथ महाराज गाडे यांच्या रसाळ वाणीतून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोपरगाव वरून श्री क्षेत्र वणी सप्तश्रुंगी गडाकडे रवाना होणाऱ्या पालखीचे प.पु.रमेशगीरीजी महाराज याच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
ढोल-ताशांच्या गजरात कोपरगाव शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. आमदार काळे यांनी देखील मनोभावे पूजन करून दर्शन घेत आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद घेतले व पालखीला खांदा देवून पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महिला भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी अध्यक्ष वाल्मिक लाहिरे, संतोष बरशे, संदीप चौधरी, किरण कोपरे, अमोल शिंदे, रवींद्र वाघ, एकनाथ राक्षे, संतोष चोपडे, आकाश पवार, महेश जंगम, नितीन जाधव, स्वप्निल विसपुते, गणेश चौधरी, अनिल चव्हाण, सिद्धेश लकारे आदींसह भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार (दि.२८) रोजी सकाळी १०.०० वा. ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मिक लाहिरे यांनी सांगितले आहे.