कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : आपल्या पाल्याचे पालन करत असताना आपली स्वतःची स्वप्ने, ध्येय, आकांक्षा, अपेक्षा आपण आपल्या पाल्यांवर लादत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांची योग्य ती काळजी घेत असतो. त्यांना हव्या त्या गोष्टी बालवयातच देत असतो, पण काही गोष्टींचा त्यांच्या बालवयातच त्यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे काळाची गरज ओळखून आपल्या मुला – मुलींना घराबाहेर पडताना संस्काराची शिदोरी देणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन हरपित रंधावा यांनी पालकांना मार्गदर्शन करताना केले.
समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये परवरीश या संकल्पनेच्या अनुषंगाने पालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होत असताना त्यांना मर्यादेपेक्षा अधिक स्वातंत्र्य देणे हे त्यांच्या दृष्टीने घातक आहे. तसंच पालक होण्याची जबाबदारी पार पाडताना लहान मुलं हे घरातील व्यक्तींचे निरीक्षण करत असतात. त्यामुळे आपल्या घरातील आचार विचार सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच जगाचे निरीक्षण करून मुलं नवनवीन कौशल्य आत्मसात करत असतात.त्यांच्या भावना आणि नियमित होणाऱ्या बदलांवर त्यांना योग्य असे मार्गदर्शन करणे ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ही मुलांना योग्य ते मार्गदर्शन अपेक्षित असते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यावर आपण घालत असलेली बंधने ही अतिशय घातक बनत चालली असून तंत्रज्ञानाचा अधिक वापर केल्याने त्याचे विपरीत परिणामही दिसून येत आहे. या विपरीत परिणामांच्या दृष्टिकोनातून पालक आणि विद्यार्थी यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. त्या दृष्टीने आजच्या या कार्यशाळेचे नियोजन केलेले आहे. तसेच संस्थेचे उपप्रचार्य समीर अत्तार यांनीही आजच्या युगात मुलांवर संस्कार होणे किती गरजेचे आहे. त्यांचे अति लाड न करता परिपूर्ण वातावरणामध्ये त्यांची मानसिक क्षमता विकसित करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा यांनी केले तर सत्कार कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन शिक्षिका माही तोलानी आणि चैताली पठारे यांनी केले. या कार्यशाळेला समताच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील पालक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांचे आभार शिक्षिका विना खंडूजा यांनी मानले.