शेवगाव तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

शेवगाव प्रातिनिधी, दि. १३: तालुक्यात गेल्या १० -१२ दिवसा पासून पावसाने दडी मारल्याने  खरिप पिकाची वाढ खुटली आहे. गेल्या महिन्यात तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मात्र तो  समाधानकारक झालेला नाही. तर अनेक मंडळात जेमतेमच झाला आहे. तरीही नजीकच्या काळात चांगला पाऊस होईल या आशेने पेरणी झाली आहे.     

तालुक्याचे खरिप हगाम उद्दीष्टाचे क्षेत्र ८४ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात आज अखेर ५६ हजार हेक्टर म्हणजे उद्दीष्टाच्या  सुमारे ६१ टक्के पेरणी झाली आहे. मागील हगामात  कपाशीला १० हजारापर्यंत वाढलेला भाव घसरून ७ ते ८ हजार प्रति क्विटल वर आला. तरीही यंदाच्या खरिप हंगामात आज अखेर जवळपास ४२ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड झाली आहे. त्याखालोखाल तूर ७ हजार ३०० हेक्टर सोयाबीन ८५, उडीद ४५, मुग ३४ हेक्टरची पेरणी झाली आहे.

सध्या ही पिके पाण्यावर आली आहेत. पिकांची वाढ खुटली आहे. तालुक्याची जीवन रेखा म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी जलाशयाचा पाणीसाठा २७ टक्याच्या आसपास खाली आल्याने दहिगाव ने, मुगी पट्यातील बागायती क्षेत्रातील खरिप पिकांसह फळबागा देखील अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे सर्वांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. येत्या दोन चार दिवसात पाऊस झाला नाही तर खरिप पिकाना फटका बसू शकतो. शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाची भिती व्यक्त करीत आहेत.