शेवगाव प्रतिनिध, दि. २४ : शेवगावच्या प्रभाग क्रमांक चार मधील जहागीरदार वस्ती मधील रहिवासी पिण्याचे पाणी अंतर्गत रस्ता वीज पुरवठा आदि अनेक समस्यांनी हैराण झाले आहेत या वस्तीकडे जाणारा येणारा रस्ता कमालीचा फुटल्यामुळे या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा अवघड बनले आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे व त्यामध्ये साचलेले पाणी ठिकठिकाणी जमा झालेला चिखल आदी समस्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना प्रसंगी बैलगाडीतून मुख्य रस्त्यावर यावे लागते, तसेच रात्री अपरात्री या वस्तीवरील कोणीही आजारी पडला तर त्याला बैलगाडीतूनच दवाखान्यात उपचारासाठी आणण्याची वेळ आल्याने या वस्तीवरील नागरिक वैतागले आहेत.
तालुक्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ही जहागीरदार वस्ती असून वस्तीवरील घरांची संख्या 75 च्या आसपास तर रहिवाशांची संख्या 200 च्या आसपास आहे. या वस्तीवर शिंदे, घनवट, गुजर, गाडे, शेख, जहागीरदार,गर्जे, पठाण आदी कुटुंब वस्ती करून राहतात शेवगाव नगरपरिषदे अंतर्गत ही वस्ती कार्यरत आहे. नगरपालिका वस्तीवरील रहिवाशांकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करते मात्र वस्तीवर अजूनही पिण्याच्या पाण्याचा नळपुरवठा जोडून देण्यात आलेला नाही.
तसेच वस्तीवरील विजेचे अनेक खांब हायमॅक्सविना उभे आहे. वस्तीवर वीज वितरण कंपनीच्या दप्तरित सिंगल फेज योजना कार्यान्वित असली तरी अनेकदा वीज पुरवठा गायब राहिल्याने वस्तीवरील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आल्याची तक्रारी आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश रोहिदास लांडे यांनी सांगितले की, माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या कार्यकाळात वस्तीकडे जाणारा भराव रस्ता करण्यात आला मात्र त्यानंतर तब्बल वीस वर्षांपासून या रस्त्यावर साधा मुरूम टाकण्यात आलेला नाही.
याबाबत वस्तीवरील नागरिकांनी नगरपालिका प्रशासन प्रभागाचे नगरसेवक आमदार खासदार आदी लोकप्रतिनिधींसह तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडे अनेकदा निवेदन देऊन रस्त्याच्या दुरावस्थेकडे संबंधिताकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ता दुरुस्ती बाबत अजूनही कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नसल्याने वस्तीवरील रहिवाशांकडून नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
याबाबत ताताडीने कार्यवाही झाली नाही व रस्ता दुरुस्त झाला नाही तर प्रसंगी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदानावर बहीष्कार टाकण्याचा निर्धार या वस्तीवरील नागरिकांनी व्यक्त केला आहे.