आपातकालीन सेवांना अधिक बळकट करण्याची गरज – रूपवते
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची स्वत: दखला घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालयामध्ये बैठक घेत, झालेल्या कार्यवाहीबद्दलचा आढावा घेतला. याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकावर निलंबनाची कार्यवाही करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाव पातळीवर कार्यरत प्रत्येक यंत्रणेने सतर्कतेने व संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे; यापुढे तालुक्यामध्ये निष्काळजीपणामुळे एकही जीव जाऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करत आपल्या सेवेत रुजू असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला सुचना देण्याची गरज आहे असे उत्कर्ष रूपवते यांनी नमूद केले.
चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट देऊन नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी, केंद्राचा सर्व स्टाफ व आशा सेविकांशी संवाद साधला. त्यानंतर मयत झालेल्या महिलेच्या कारवाडी येथील घरी भेट देऊन परिवाराची विचारपूस केली. मयत गांगुर्डे यांच्या बाळाला योग्य त्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला सूचना त्यांनी केल्या आहेत.
यावेळी कोपरगावचे तहसिलदार संदीपकुमार भोसले, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडीत वाघेरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप, तालुका संरक्षण अधिकारी विकास बागुल, केस वर्कर वन स्टॉप सेंटर अहमदनगर ममिता पावरा, समुपेदशक नितीन थोरात, समुपदेशक वैशाली झालटे आदी उपथिस्त होते.