शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : श्रीरेणुका माता मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचे संस्थापक चेअरमन ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिल्ली सरकारच्या ओ.बी.सी आयोगाकडून देण्यात येणाऱ्या देशपातळीवरील राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्य महोत्सव दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.१३) दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात आ.बो.सी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, सचिव रणजीत सिंग यांच्या उपस्थितीत कर्नल पुनम सिंग, जी.एस.टी कमिशनर सारांश महाजन यांचे हस्ते अर्थतज्ञ डॉ. भालेराव यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.
देशातील नऊ राज्यात १३८ शाखांच्या माध्यमातून बाराशे कर्मचाऱ्यामार्फत दहा लाखावर खातेदारांना सेवा देण्या बरोबरच रेणुका फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. भालेराव यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य सातत्याने चालू असते. आता पर्यंत त्यानी अनेक संस्थांना मदत केली आहे. विविध विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारून त्यांना शालेय साहित्य, गणवेश व शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अर्थ सहाय्य केले आहे.
अनेक शैक्षणिक संस्थाना, ग्रामपंचायतींना विविध स्वरूपाची खेळणी, प्रोजेक्टर, बेंच, सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. अनेक मतिमंद मुलांच्या शाळांना, वृद्धाश्रमांना देखील संतरज्या, चादरी, रग, वस्त्र व मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली जाते. डॉ. प्रशांत भालेराव यांनी अशा प्रकारच्या सेवा केलेल्या कार्याची दिल्ली सरकारच्या ओ.बी.सी आयोगाने दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
डॉ. भालेराव यांचे समवेत जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. सुधा कांकरीया, प्राचार्य डॉ. बार्नबस, संगमनेरच्या सामाजिक कार्यकर्त्या जयश्री बाळासाहेब थोरात, बुथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी देवदत्त कळकुंबे, माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा यांचाही यावेळी या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.