शेवगावच्या पाणी प्रश्नासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आंदोलनचा निर्धार – राजेंद्र दौंड

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग हा अत्यंत दुष्काळी भाग म्हणून सर्व परिचित आहे. येथील पाणी प्रश्न स्थानिकांच्या जिव्हाळ्याचा तरी राजकारण्याच्या वर्षानुवर्षे केवळ निवडणूकी पुरता विषय बनला आहे.

येथील पाणी व इतर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झालेले आहे. काही जण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकांना खोटी आश्वासने देऊन झुलवत ठेवत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे प्रश्न मार्गी लावण्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पुढाकार घेऊन आंदोलन करण्याचा निर्धार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी दौंड यांनी चौफेर टोले बाजी केली. ते म्हणाले, लाडजळगाव जिल्हा परिषद गटातील गोळेगाव तलावाची उंची वाढवून त्यात अडीच ते तीन टीएमसी पाणी अडवून ते पाणी पाटा द्वारे लाडजळगाव, शेकटे, गोळेगाव, मुरमी, बाडगव्हाण या गावांना देऊ असे आमिष जिल्हा परिषद सदस्यानी मोठ्या हिरीरीने दाखवले होते. मात्र यातून आजपर्यंत काहीही निष्पन्न झाले नाही, पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नेहमीप्रमाणे ताजनापूरच्या जून्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत पाणी प्रश्नाचे गजर दाखवले जात आहे.

पाणी निश्चीत मिळणार असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस एकसंघपणे शेतक-यांच्या पाठीशी उभा राहील. परंतु हा प्रश्न जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कक्षेत नाही, त्याचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर करावा लागणार आहे, स्थानिक लोकप्रतिनिधीनी तो गांभीर्याने घ्यायला हवा. त्याकडे त्यांचेही लक्ष नाही, हे या भागातील जनतेचे दुर्दैव आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या प्रश्नावर माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आंदोलन करण्यात येईल, असे दौंड यांनी नमुद केले.