शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : असंख्य भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री क्षेत्र अमरापुर येथील श्री रेणुका माता मंदिरातील दागिन्याच्या चोरी प्रकरणाचा तपास लावण्यासाठी, शेवगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांच्या वतीने स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून आरोपींच्या शोधार्थ ही पथके, विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्राने दिली.
काही दिवसात पाथर्डी, नगर तसेच शेवगाव, भागातील मंदिरात दान पेट्या फोडण्याचा तसेच किंमती साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत, ते विचारात घेऊन येथील प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून, सर्व शक्यतांची पडताळणी करुन, पथके स्थापन करुन, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले आहे.
तसेच काही संशयीतांची माहिती संकलित करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आल्याचे विभागीय पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास, श्री क्षेत्र अमरापुर येथील श्री रेणुका माता देवस्थानातील २१ किलो ६०० ग्राम वजनाच्या, छत्री, टोप, मासोळ्या, समया, राज दंड आदि चांदीच्या तसेच सोन्याची नथ व पेंडॉल असा एकूण १६ लाख ७६ हजार ४०० रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. मंदिर परिसरात नियमीतपणे मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक, सेन्सॉर सुरक्षा यंत्रणा असताना देखील झालेल्या चोरीच्या घटनेमुळे तपास यत्रणा चक्रावली आहे.
अमरापुर येथील श्री रेणुका माता देवस्थान हे अत्यंत जागृत स्थान असून त्यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. लाखोचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानात झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी या चोरीचा तपास त्वरित लागावा अशी सर्वांची मागणी आहे, सरपंच आशा गरड.
उलेखानिय घटना म्हणजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील हे, काही दिवसांपूर्वी एका घटनेत आरोपीचा पाठलाग करताना जखमी झाले असताना देखील ते त्या अवस्थेत घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन तपास कामी लक्ष घातले. अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांनीही येऊन तपास कामाचा आढावा घेतला.