पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेच्या शाखेचा विस्तार होणार- आमदार काळे

याहीवर्षी पतसंस्थेने १५ % लाभांश दिला

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : सहकारी संस्था चालवताना आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत असणाऱ्या घटकांचे हित जोपासले पाहिजे हि शिकवण कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी दिली आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेने दरवर्षी १५ % लाभांश देण्याची सुरु ठेवलेली परंपरा याहीवर्षी अबाधित ठेवली असल्याचे प्रतिपादन करून पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचा विस्तार होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.            

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२२-२३ या वर्षाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात (दि.१९) रोजी माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना आ. आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे होते.

ते पुढे म्हणाले की, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्था कर्मवीर शंकर काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी आधारस्तंभ बनली आहे. याहीवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि कौतुकास्पद बाब आहे. संस्थेने संपादन केलेल्या विश्वासाच्या बळावर ठेवींमध्ये सातत्याने होणारी वाढ ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिक आहे.

ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करून ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणी प्रमाणे तत्काळ परत करीत आहे. त्यामुळे संस्थेच्या ठेवीत भविष्यात सातत्याने वाढ होणार असून संस्थेवर कर्जदार, ठेवीदार यांचा दृढविश्वास असल्याचे सिद्ध होत आहे. यापुढील काळातही संस्थेने अशीच आर्थिक शिस्तीची जपवणूक करून नियोजनबध्द कारभार करून संस्थेची आर्थिक भरभराट साध्य करावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

दि. ३१/०३/२०२३ अखेर संस्थेकडे ३६ कोटी ५१ लाखाच्या ठेवी होत्या यामध्ये सातत्याने वाढ सुरुच असून आज अखेर ३७ कोटीच्या ठेवी आहेत. अहवाल सालात संस्थेने २६ कोटी ८४ लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकर काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.३९ % आहे.

संस्थेने एन.पी.ए. तरतूद रुपये ७ कोटी ३२ लाख ६४ हजारांची केली आहे. १००% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. ० % आहे. सहकार कायद्यानुसार २२ कोटी ५९ लाखाची गुंतवणूक केली असून लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून ८१ लाख १५ हजार रुपयांचा नफा होवून पतसंस्था आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे सिद्ध होत आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे कौतुक केले.

अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख यांनी केले. यावेळी सर्व विषय सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सचिन चांदगुडे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, श्रीराम राजेभोसले, शिवाजी घुले, मनोज जगझाप, शंकर चव्हाण, श्रावण आसने, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, माजी संचालक नारायण मांजरे, वसंतराव दंडवते, बाबुराव कोल्हे, 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, पंचायत समितीचे मा. सभापती अर्जुनराव काळे, शरद पवार पतसंस्थेचे व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कुक्कुट पालनचे व्हा. चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.