उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतनिधी, दि. १२ : मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून राज्यात अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण, आंदोलन केले जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे सोमवार (११ सप्टेंबर) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सोमवारी रात्री उपोषणस्थळी भेट देऊन या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील  यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून राज्य सरकारकडून वारंवार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जोपर्यंत सरकार मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देणार नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही व उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण मागणीचा जोर वाढत असून, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण, आंदोलन केले जात आहे. त्या अनुषंगाने  कोपरगाव शहरात ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत या मराठा समाजबांधवांनी  ११ सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. इतर समाज बांधव साखळी उपोषण व पाठिंबा दर्शवित आहेत त्यास युवा नेते विवेक कोल्हे यांनी सोमवारी रात्री उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला व उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या रास्त असून, या मागण्यांबाबत व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व आपण शासनाकडे जरूर पाठपुरावा करू, अशी ग्वाही विवेक कोल्हे यांनी उपोषणकर्त्यांना दिली. 

यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले की, मराठा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे कायदेशीर पाठपुरावा करून लोकसभेच्या आगामी अधिवेशनात भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करून शेड्युल ९ मध्ये तरतूद करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत योग्य कार्यवाही करावी.

राज्य सरकारने केंद्रीय मागास आयोगाकडे मराठा आरक्षणाबाबत पाठपुरावा करावा तसेच सर्वोच्च न्यायालयात टिकेल असे उचित भक्कम आरक्षण मराठा समाजाला त्वरित द्यावे आदी मागण्यांसाठी हे आमरण उपोषण केले जात आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.  याप्रसंगी सकल मराठा समाजबांधव, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.