कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोपरगाव शहरात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या वाजवेल तो गाजवेल ढोल-ताशा वादन स्पर्धा-२०२३’ ला उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. कोपरगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात मंगळवारी (२६ सप्टेंबर) रात्री भरपावसात मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल-ताशा पथकांनी शिस्तीत वैशिष्ट्यपूर्ण लय व तालबद्ध ढोल वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण शहर ढोल-ताशा, झांज, घंटा अशा पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटाने व गणपती बाप्पा मोरया, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेले होते. पुढील वर्षी मोठ्या जागेत आकर्षक बक्षिसांसह भव्य प्रमाणात ही स्पर्धा घेतली जाईल, असे विवेक कोल्हे यांनी यावेळी घोषित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देऊन त्यांनी देशभरातील महिलांचा सन्मान केला असल्याचे सांगून विवेक कोल्हे यांनी या स्पर्धेतही ढोल-ताशा पथकात महिलांना विशेष स्थान दिल्याबद्दल मंडळांना धन्यवाद दिले. या स्पर्धेत हत्ती गणपती तरुण मंडळाच्या पथकातील हर्षदा किरण सोनवणे या दिव्यांग मुलीने एका हाताने ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मनात जिद्द आणि काही तरी करून दाखविण्याची उर्मी असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे तिने दाखवून दिले. विवेक कोल्हे यांनी हर्षदाचे विशेष कौतुक करून तिचा सन्मान केला.
या स्पर्धेचे उद्घाटन अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे विश्वस्त सुमित कोल्हे व योग प्रशिक्षक अभिजीत शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पारितोषिक वितरण संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाले. हिंदुवाडा तरुण मंडळ, कोपरगाव (प्रथम), हत्ती गणपती तरुण मंडळ, कोपरगाव (द्वितीय), प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ, कोपरगाव (तृतीय) व राजमुद्रा प्रतिष्ठान, कोपरगाव (चतुर्थ) यांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हिंदुवाडा तरुण मंडळ व हत्ती गणपती तरुण मंडळ यांना रोख २१ हजार रुपये तर प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळाला रोख १५ हजार रुपये व राजमुद्रा प्रतिष्ठानला रोख १० हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारी ढोल-ताशा वादनाची पारंपरिक कला जपण्यासाठी तसेच ढोल-ताशा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने यंदा प्रथमच ‘वाजवेल तो गाजवेल ढोल-ताशा वादन’ स्पर्धेचे आयोजन केले.
यापुढील काळातही संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांबरोबर दहीहंडीसारखे पारंपरिक खेळ तसेच धार्मिक, कला, संस्कृती टिकविण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल-ताशा पथकांचे व स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व युवा सेवकांचे आभार मानून त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कोपरगावात प्रथमच झालेल्या या ढोल-ताशा वादन स्पर्धेत शिवराय तरुण मंडळ, सनी ग्रुप, तुळजाभवानी तरुण मंडळ, हिंदुवाडा तरुण मंडळ, प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ, विजेता तरुण मंडळ, राजगड तरुण मंडळ, क्रांती युवक संघटना, राजमुद्रा प्रतिष्ठान, हत्ती गणपती तरुण मंडळ, कोपरगाव आदी मंडळांच्या ढोल-ताशा पथकांनी लयबद्ध झांज, घंटा नाद व ढोल-ताशांचा गगनभेदी गजर करत वैविध्यपूर्ण चाली सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी संगमनेर येथील हिंदू शंखनाद ढोल-ताशा ध्वज पथकाने सादर केलेले सुंदर वादन खास आकर्षण ठरले. युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्वत: ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. ढोल-ताशा पथकांचा सुंदर कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भरपावसात ढोल-ताशा वादकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात युवकांसोबत युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. परीक्षक म्हणून सौरभ चांगले व शोन थोरात यांनी काम पाहिले.
यावेळी गोदावरी नदीत बुडणाऱ्या एका विद्यार्थिनीचा जीव वाचवल्याबद्दल सोमनाथ आहेर, दीपक थोरात, किरण सिनगर, संजय जगधने, विजय मरसाळे यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवा नेते विवेक कोल्हे यांनी या अभिनव स्पर्धेचे आयोजन करून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिल्याबद्दल स्पर्धकांनी त्यांचे आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रामदास गायकवाड, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, स्वप्निल मंजुळ, आकाश वाजे, सिद्धांत सोनवणे, विशाल गोर्डे, विक्रांत सोनवणे, वासुदेव शिंदे, पंकज कुऱ्हे, स्वराज सूर्यवंशी, सतीश निकम,
भैय्या नागरे, स्वराज लकारे, सागर राऊत, प्रशांत संत, कुणाल आमले, मंगेश पवार, संतोष जाधव, राहुल माळी, अजय गायकवाड, अर्जुन मरसाळे, समाधान कुऱ्हे, दिनेश गाडेकर, रवींद्र लचुरे, रुपेश सिनगर, ओम बागुल, नरेंद्र लकारे, दत्तात्रय कोळपकर, समीर खाटीक, इलियास शेख, अनिल जाधव, सिध्दार्थ पाटणकर, वैभव सोळसे, अभिजित सूर्यवंशी, अमोल बागुल, समीर सुपेकर, मोनू म्हस्के आदींसह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, शिवसेनेचे नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त दिलीप घोडके, माजी नगरसेवक अशोक लकारे, शिवाजी खांडेकर, भीमा संवत्सरकर, गोपीनाथ गायकवाड, कैलास खैरे, वैभव आढाव, सुशांत खैरे, प्रसाद आढाव, सतीश रानोडे, अल्ताफभाई कुरेशी, रवींद्र रोहमारे, खलिकभाई कुरेशी, इलियास खाटीक, फकिर मोहम्मद शेख पैलवान, किरण सुपेकर, चंद्रकांत वाघमारे, विजय चव्हाणके, सागर जाधव, संतोष नेरे, शब्बीरभाई, शफिकभाई सय्यद, एस. पी. पठाण, शंकर बिऱ्हाडे, अनिल जाधव आदींसह भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, युवा सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.