शेवगाव प्रतिनीधी, दि. २६ : दु:खाला सुखात अन् अडचणींना संधीत रूपांतरीत करण्याची मानवी मनाची किमया आहे. सर्वांनाच ती साधते असे नाही. परंतु ही किमया साधणारे अनेक जण आपल्या सभोवती असतात अन् ते सर्वांनाच प्रेरक ठरतात. येथील शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांना ती किमया साधली आहे.
त्यांना भेटायला गेलेल्या सुमारे पाचशेहून अधिक व्यक्तींना पुस्तक भेट देत तुम्ही वाचा, इतरांना वाचण्याची प्रेरणा द्या असा आग्रह धरत त्यांनी वाचन चळवळ जोपासली आहे. किरकोळ झालेल्या अपघातामुळे सध्या तर डॉ. गाडेकर घरी आहेत तरीही त्यांनी पुस्तक भेट उपक्रमात खंड पडू दिलेला नाही. भेटायला येणाऱ्यांना ते स्वामी विवेकानंदाची पुस्तके भेट देतात.
खरेतर पुस्तकासारखा मित्र अन् ग्रंथासारखा गुरू नाही. परंतु, मोबाईलच्या युगात शालेय मुले व सर्वच वयोगटातील व्यक्तींचे वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. मोबाईल व तंत्रज्ञान गरजेपुरतेच हवे त्याचा अतिरेक नको. मुले, पालक व शिक्षकांनी पुस्तके वाचून ज्ञान वाढवणे गरजेचे असून खारीचा वाटा म्हणून जमेल तशी वाचन चळवळ सुरू केली आहे. – डॉ. शंकर गाडेकर,
जीवन शिक्षण या मासिकाने जून २०२३ चा वाचनसिद्धी अंक प्रकाशित केला होता. गाडेकरांनी तो अंक एका बैठकीतच वाचला. वाचनाचे महत्व सांगणारे लेख त्या अंकात होते. तेव्हा पासून त्यांनी वाचनाचे महत्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना समाजावे यासाठी वाचन चळवळ सुरू केली असून गेल्या चार महिन्यात त्यांनी ५०० च्या वर स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण व व्यक्तिमत्व अशी पुस्तके भेट दिली आहेत. शाळाभेट, सोशल मिडीया व ब्लॉगवर लेखन करीत सर्वच शिक्षकांनी या अंकाचे वाचन करण्याचा आग्रह धरत वाचन चळवळ हा उपक्रम सुरु करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.