कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : खेड्यापाड्यातील कलाकारांमध्येही टॅलेंट असते. ग्रामीण भागातील कलावंतांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता पुढे येणे गरजेचे आहे. कोपरगाव व तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गुणी, कसदार कलावंत आहेत. कला हे समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन असून, ही कला जोपासण्यासाठी ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे सोमवारी (२ ऑक्टोबर) हिंदू रक्षक ग्रुपच्या वतीने रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आपण कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील कलाकारांना मूलभूत सोयी-सुविधा व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील कलागुणांना सातत्याने उत्तेजन दिले. कोपरगाव व परिसराला ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक व कलेचा मोठा वारसा लाभला आहे. कोपरगावच्या भूमीत अनेक मोठे कलावंत घडले आहेत, घडत आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीय सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, फक्त शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातसुद्धा अशा पद्धतीचे मोठमोठे कार्यक्रम होऊ शकतात, त्यात सर्वसामान्य घटक सहभागी होऊ शकतो हे आज दिसून आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हिंदू रक्षक ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. भारतीय संस्कृतीत रांगोळीला धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.
रांगोळी हे एक मांगल्याचे प्रतीक मानले जाते. देव्हाऱ्यापुढे, अंगणात व कोणत्याही शुभप्रसंगी रांगोळी काढली जाते. आज रांगोळीची अनेक पारंपरिक व आधुनिक रूपे आपल्याला पहायला मिळतात. रांगोळी कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगोळी स्पर्धा होण्याची गरज आहे. अगदी लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये कला रुजवायला हव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार मिळेल. विविध प्रकारच्या कलांना लोकाश्रयाबरोबर राजाश्रय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कलात्मक पद्धतीने साकारलेल्या सुबक, आकर्षक रांगोळ्यांची पाहणी करून स्पर्धक कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव कदम, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव लामखडे, उपसरपंच संदीप कदम, माजी उपसरपंच शशिकांत सोनवणे, उत्सव मंगल कार्यालयाच्या संचालीका दुर्गाताई आरिंगळे, गोदा व्हॅली इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष शेखर कदम, शिवशंकर पतपेढीचे व्यवस्थापक बाळासाहेब निमसे, भुसे, ऋषिकेश लक्ष्मणराव कदम, प्रियंका ऋषिकेश कदम आदींसह हिंदवी रक्षक ग्रुपचे सर्व सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका थोरात यांनी केले, मंडलकर यांनी आभार मानले.