कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार, कार्यकुशल व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व तथा भाजप नेत्या स्नेहलता बिपीन कोल्हे यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे इगतपुरी (जि. नाशिक) तालुक्यातील एसएमबीटी हॉस्पिटलच्या सहकार्याने रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी कोपरगावातील कलश लॉन्स येथे आयोजित मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तसेच रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. या शिबिरात हजारो रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करवून घेऊन उपचार घेतले.
या शिबिरात एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार, कर्करोग, नेत्र विकार, रक्तदाब, मधुमेह, छातीत दुखणे, डोकेदुखी, डोळ्यांचे आजार अशा वेगवेगळ्या आजारांची मोफत तपासणी करून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्यांना कोपरगाव येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संजीवनी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रातील डॉक्टर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. स्नेहलता कोल्हे यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण झाले. तसेच स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदारसंघात समाविष्ट राहाता तालुक्यातील जळगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचलित संजीवनी आयुर्वेद हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. त्याचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व कोल्हे कुटुंबीय अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत व अडीअडचणीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर व अग्रेसर असते. कोल्हे कुटुंबीयांनी कोरोना महामारीच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मोफत औषधोपचार, भोजन पुरवून त्यांचे प्राण वाचवले.
कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत फिरता दवाखाना सुरू केला असून, त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक नागरिकांनी स्नेहलता कोल्हे व कोल्हे कुटुंबीयांचे आभार मानले.
दरम्यान, स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्ष, संस्था, संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, भाजप, शिवसेनेसह इतर विविध पक्ष, महिला मंडळे, महिला बचत गट, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, शासकीय अधिकारी, सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग, कला, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यातून त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली. हे प्रेम पाहून स्नेहलता कोल्हे भारावून गेल्या होत्या. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानून यापुढील काळातही नागरिकांनी कोल्हे कुटुंबीयांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.