टपाल खात्याची विश्वासार्हता अजुनही टिकुन – हेमंत खडाकीकर

कोपरगाव प्रतिनिधी ,दि.११: जगातील १५१ देश जागतिक टपालदिन ५४ वर्षापासुन साजरा करतात. टपाल कार्यालय आणि जनता एक अतुट विश्वासाचे नाते असुन जागतिक टपाल सप्ताहानिमीत्त सर्व पोष्ट पदाधिकारी व कर्मचा-यांनी पोष्टाच्या असंख्य योजनांची माहिती देवुन नागरिकांचा विश्वास मिळवावा, टपाल खात्याची विश्वासार्हता अजुनही टिकून असल्याचे प्रतिपादन डाक अधिक्षक हेमंत खडाकिकर यांनी केले.

तालुक्यातील संवत्सर परिसरासह अन्य गावातील टपाल कार्यालयातील कर्मचा-यांनी जागतिक टपाल सप्ताह नुकताच साजरा केला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संवत्सर ब्रांच पोष्टमास्तर दत्तात्रय गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. हेमंत खडाकीकर पुढे म्हणाले की, स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे १८७४ मध्ये टपाल खात्याच्या युनिव्हर्सल पोष्ट युनियनच्या पदाधिका-यांनी जागतिक टपाल दिन साजरा व्हावा म्हणून संकल्पना मांडली त्याला ९ ऑक्टोंबर १९६९ मध्ये टोकीओ (जपान) येथे भरलेल्या जागतिक स्तरावरील पोष्टल कॉंग्रेस मध्ये यश आले आणि तेंव्हापासुन हा जागतिक टपाल सप्ताह साजरा करण्यास सुरूवात झाली. 

आज समाज माध्यमे अत्यंत प्रगत झाली आहे.अभासी तंत्रज्ञानाने आपल्या जीवन दिनचर्येचा संपुर्णपणे ताबा घेतला आहे. चोवीस तासातील कित्येक तास आपण भ्रमणध्वनीच्या सानिध्यात राहतो आहोत. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या घरात गेली आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत असले तर भारतीय पोष्ट खात्यावरील नागरिकांचा विश्वास तसुभर देखील कमी झालेला नाही. 

 टपाल खात्याने असंख्य नव नविन योजना अंमलात आणल्या असुन त्या प्रत्येकाने समजुन घेवुन त्याच्या अंमलबजावणीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. कोरोना महामारीत टपाल खात्याने केलेल्या कामाचे संपुर्ण देशभर स्वागत झाले. प्रत्येक टपाल खात्याच्या कर्मचा-यांनी नागरिकामध्ये जाउन विविध योजनांची माहिती देवुन त्यातून टपाल खात्याचा व्यवसाय वृध्दींगत करावा.

याप्रसंगी तक्रार निवारण अधिकारी विनायक शिंदे, डाक निरीक्षक अनंत सोनवणे, मेल ओव्हरसियर अर्जुन मोरे, संजय ढेपले, शिंगणापुर सब पोष्ट मास्तर रविंद्र परदेशी, किशोर दिघे (दहेगांव), हौशिराम भिंगारे (करंजी), बाळासाहेब आहेर, लक्ष्मण भोकरे, लोणकरवस्तीचे ब्रांच पोष्टमास्तर आर.बी.पवार, आर.ए. आढाव यांच्यासह विद्यार्थी महिला, टपाल ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते, सुत्रसंचलन व आभार संवत्सरचे पोष्टमन जीवन पावडे यांनी मानले.