कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : संजीवनी मंत्राचे जनक, दैत्यगुरू सदगुरू श्री शुक्राचार्य महाराज यांचे जगातील एकमेव मंदिर गोदावरी नदीकाठी कोपरगाव येथे बेट भागात आहे. या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व असून, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी ‘शुक्र तीर्थ’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केल्यामुळे सदगुरू श्री शुक्राचार्य महाराजांची माहिती व महती आता जगभरात भक्तांपर्यंत पोहोचेल व या देवस्थानचा नावलौकिक आणखी वाढेल, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील श्रीक्षेत्र बेट भागात असलेल्या परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी लिहिलेल्या ‘शुक्र तीर्थ’ या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर रविवारी (१५ ऑक्टोबर) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ संत प.पू. परमानंदजी महाराज, कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती गुरुवर्य श्री महंत प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आणि अनेक संत-महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोपरगाव ही ऐतिहासिक, धार्मिक व पौराणिक भूमी आहे. लाखो भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेली अनेक प्राचीन मंदिरे व तीर्थस्थळे कोपरगाव शहर व तालुक्यात आहेत. ज्यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून गायत्री व महामृत्युंजय मंत्रापासून तयार झालेला संजीवनी मंत्र भगवान शंकराकडून प्राप्त करून घेतला अशा पराक्रमी व तपस्वी दैत्यगुरू परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे मंदिर गोदावरी नदीकाठी कोपरगाव शहरानजीक श्री क्षेत्र बेट येथे आहे.
हे जगातील एकमेव मंदिर असून, ते आपल्या कोपरगावात आहे ही आपल्या सर्वांसाठी परमभाग्याची व गौरवाची गोष्ट आहे. या मंदिरात कोणते ही शुभकार्य, विवाह करण्यास कोणता ही मुहूर्त लागत नाही. आपल्या सर्वांवर सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा शुभाशीर्वाद व कृपादृष्टी असून जी त्यांच्या भावभक्तीतून प्राप्त झाली आहे.
थोर ज्ञानी व तपस्वी दैत्यगुरू परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांचे जीवनकार्य व त्यांची महती सांगणारे सुंदर असे ‘शुक्र तीर्थ’ हे मराठी पुस्तक परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांचे जीवनकार्य व या देवस्थानचा इतिहास समाजासमोर आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
त्यांच्या या मराठी पुस्तकाचा अतिशय सोप्या भाषेत इंग्रजीत अनुवाद केला असून, या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर झाले ही आनंदाची बाब आहे. या इंग्रजी पुस्तकामुळे सद्गुरु शुक्राचार्य महाराज देवस्थानची महती आता जगभरात पोहोचणार असल्याचे सांगून स्नेहलता कोल्हे यांनी त्याबद्दल बाळासाहेब आव्हाड यांचे अभिनंदन केले.
सद्गुरु शुक्राचार्य महाराज देवस्थानच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी स्नेहलता कोल्हे यांनी सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच लेखक बाळासाहेब आव्हाड व अनुवादक आदिती आव्हाड यांचा त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
प.पू. परमानंदजी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनीही बाळासाहेब आव्हाड यांचे अभिनंदन करून शुभाशीर्वाद दिले. देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, ‘महानंद’ चे अध्यक्ष राजेश परजणे, श्री शुक्राचार्य महाराजांचे परमभक्त विशाल दोशी, डॉ. दत्तात्रय मुळे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,
सचिव अॅड. एस. डी कुलकर्णी, खजिनदार अॅड. गजानन कोऱ्हाळकर, सदस्य हेमंत पटवर्धन, सुहास कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.आर.टी. भवर, डॉ. विजय क्षीरसागर, अॅड. नितीन भवर, दीपक विसपुते, इंग्रजी अनुवादक आदिती हर्षल आव्हाड, हर्षल आव्हाड, ओंकार आव्हाड, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय वडांगळे, राजेंद्र (मुन्ना) आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे,
मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजय रोहम, आदिनाथ ढाकणे, विलासराव दशरथ आव्हाड, विलास रंगनाथ आव्हाड, अरुण जोशी, दिलीप सांगळे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, राजेंद्र पंडोरे, विकास शर्मा, व्यवस्थापक राजाराम पावरा, भीमा संवत्सरकर, दादा नाईकवाडे, किरण सुपेकर, सचिन सावंत, जयप्रकाश आव्हाड, मुन्ना आव्हाड, सुशांत घोडके, आदींसह सर्व संतगण, विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक-भक्त व बेट भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.