कोपरगाव प्रतिनिधी,दि.१६ : आजपासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. हा तांत्रिक दोष तातडीने दूर करण्यात यावा आणि निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारावेत व त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी, अशी सूचना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला आहे. या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. त्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून, त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कुंभारी, घोयेगाव, ब्राह्मणगाव, वारी, कान्हेगाव, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर या १७ तर मतदारसंघात समावेश असलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, पुणतांबा-रस्तापूर या ४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी १६ ते २० ऑक्टोबर २०२३ असा असून, राज्यभरात आज (१६ ऑक्टोबर) पासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद पडल्यामुळे आज नगर जिल्ह्यात एकाही उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरता आला नाही.
ग्रा.पं.निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली असताना निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने एकच गोंधळ उडाला आहे. आज दिवसभर सर्व्हर डाऊन झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह नगर जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची बरीच खटपट केली; पण तरीही वेबसाईट बंद असल्याने त्यांना अर्ज न भरताच परत जावे लागले.
सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारी अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) असेच बंद राहिले किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाही. परिणामी ते निवडणूक लढण्याच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात.
त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी उमेदवारांना द्यावी. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याबाबत आयोगाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
याबाबत जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने त्वरित हालचाली करून योग्य कार्यवाही करावी. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) व्यवस्थित चालू होईपर्यंत ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा द्यावी, जेणेकरून इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही, अशी सूचना मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.