आयोध्या नगरीत सिता स्वयंवर सोहळा संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : धरणीचे आकाशाशी जोडले नाते स्वयंवर झाले. सीतेचे अशा जय घोषात व भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात येथील आयोध्या नगरीत सिता स्वयंवर सोहळा पार पडला. रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांच्या मधुरा वाणीने हा सोहळा लक्षणीय ठरला. असे ढोक महाराज म्हणाले.

श्रीराम कथा केवळ मनोरंजनासाठी नाही तर संसारातील व्यथा कमी करण्यासाठी तसेच सदाचाराने जीवन जगावे याचे मार्गदर्शन मिळत असल्याने आज हजारो वर्षानंतरही श्रीराम कथेचे महत्व कायम आहे. पृथ्वीतलावर जोपर्यंत अस्तित्व आहे. तोपर्यंत रामकथा समस्त मानव जातीला प्रेरणादायी ठरणार आहे.

जीव हे दुःखाचे स्वरूप तर संत हे सुखाचे स्वरूप असून देव सुख आणि दुःखाचे स्वरूप आहे. परमेश्वराला भोळी भाबडी भक्ती प्रिय असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा अहंकार बाजूला सारून परमेश्वराची भक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात गुरूंचा महिमा अगाद असून गुरु हा शिष्याला अंधारातून प्रकाशात नेण्याचे काम करीत असल्याने गुरूंचा महिमा मोठा आहे. प्रभू श्रीरामचंद्र सदाचाराचे स्वरूप असून सीतामाई समर्पणाचे स्वरूप असल्याने रामकथा सदाचार व समर्पणाचा उत्तम भाव आहे.

यावेळी येथील शिवाजी गरड यांनी स्वतः हस्ताक्षरात लिहिलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत ढोक महाराजांना भेट दिली. आमदार मोनिका राजळे ॲड. द्वारकानाथ बटुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, माजी नगरसेवक महेश फलके, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, वृद्धेश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे आदींच्या हस्ते ग्रंथ पूजन व आरती करण्यात आली. मुख्य गायक काशिनाथ महाराज सहगायक, संतोष संबळे महाराज तबलावादक, अश्विन कुमार यांची साथ लाभली. भाविकांची उपस्थिती वाढल्याने संयोजकांनी बैठक व्यवस्था वाढवली आहे.