एसएसजीएम महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : एस. एस. जी. एम. महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दि. १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांनी संपन्न झाला. या सप्ताहात ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, ग्रंथपरिचय स्पर्धा, विद्यार्थी मनोगते, भाषणे, काव्यवाचन एक तास वाचनासाठी आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

दि.१७ रोजी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विद्यार्थी मनोगते काव्यवाचन व भाषण कार्यक्रमात सानिका पांगारकर, पूजा खटकाळे, कल्याणी खटकाळे, शीतल घोटेकर, ऋतुजा मोहिते इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना तसेच इतर उपक्रमात यश संपादन केलेल्या समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सप्ताह समारोप कार्यक्रमासाठी गौतमनगर येथील सुशिला काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी डॉ. अब्दुल कलामांच्या जीवनकार्याची आठवण देऊन वाचनाचे महत्व सांगितले. त्यांना मिसाईल मॅन म्हणून का ओळखले जाते? याबद्दल सांगून, वाचनातून चिकित्सक वृत्ती निर्माण होते. दृष्टी वाचायला मदत करते तर वाचन दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम करते. असे सांगून डिजिटल युगाचा वापर विद्यार्थ्यांनी माहिती घेण्यासाठी करावा. केवळ लाईक, शेअर यासाठी करू नये. कुठलीही गोष्ट प्रमाणात असावी. अतिरेकीपणाचा तोटाच असतो, हे ध्यानी घ्यावे. प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. आर. सानप यांनी भूषविले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी वाचन संस्कृती लोक पावत असल्याची खंत व्यक्त करून, पूर्वी करमणूक साधनांचा अभाव होता. त्यामुळे वाचन मोठ्या प्रमाणावर घडत होते. आताही भविष्य घडविण्यासाठी वाचनाचीच गरज आहे, असे सांगून या वाचनाच्या जोरावरच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार लाभलेले, राष्ट्रपती झालेले डॉ. कलाम हे पहिले शास्त्रज्ञ, राष्ट्रपती आहेत याची जाणीव करून दिली आणि विद्यार्थ्यांनी वाचनाचा संकल्प करावा असे आवाहन केले.

डॉ. अब्दुल कलाम आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी केले. वाचन हे जग व जीवनाचे ज्ञान मिळविण्यासाठीचे दार असून प्रत्येकाने त्यातून डोकावले पाहिजे. त्यासाठी झोपण्यापूर्वी किमान दहा मिनिट वाचन करूनच झोपण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन करून त्यांनी कार्यक्रमाचा हेतू कथन केला.

प्रा. डॉ. बी. आर. शेंडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. रावसाहेब दहे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रा. भागवत देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला भोर यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमासाठी प्रा. किरण पवार, प्रा. देवकाते, प्रा. सुनील काकडे, डॉ. रंजना वर्दे, प्रा. बाबासाहेब वाघ, प्रा. जयश्री शेंडगे, प्रा. कलावती देशमुख, प्रा. उमप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.