मावा, गुटखा छाप्यात दोघे रंगेहात पकडून गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकान शेवगावातील क्रांति व आंबेडकर चौकातील दोन अवैध मावा गुटखा विक्रेत्यावर टाकलेल्या छाप्यात दोघाना रंगेहात पकडून त्यांच्या कडून सहा किलो मावा जप्त केला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून जमीर इकबाल शेख (वय-२५) व हयान जानमहमंद शेख (वय-३०) दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर  रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईची माहिती शहरात पसरताच इतर विक्रेत्यानी त्यांची दुकाने बंद करून त्यातील मावा गुटखा सुगंधी सुपारी इतर साहित्य तेथून पसार केले. राज्यात बंदी असलेला मावा गुटखा सुंगंधी तांबाखु येथे सर्रास विकली जात आहे. शेवगावात विविध प्रकारच्या माव्याच्या पन्नास फुटाच्या अंतराने असंख्य टपर्‍या आहेत. शहरातील विविध शाळा महाविद्यालये, क्लासेस, दवाखाने, सरकारी कार्यालयाच्या परिसरात देखील मावा विक्री जोरात होत. असल्याने अनेक विद्यार्थी युवक तरुण व्यसनाधिन झाले आहेत.

शेवगावात मोठ्या प्रमाणात ठोकीने मावा व गुटखा पुरविणारे कारखाने देखीलकार्यरत असून त्यांच्या मार्फत जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी ‘मावा’ गुटख्याचा पुरवठा केला जातो. लाखो रुपयाची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायामुळे शेवगावातील गुन्हेगारी फोफावली आहे. त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था देखील धोक्यात सापडली आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून देखील स्थानिक पोलिस प्रशासन शांत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान गुरुवारी (दि.१९) अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने शहरातील दोन ठिकाणच्या टपर्‍यावर धडक कारवाई करून बंदी असलेला सुट्टा व ब्रँण्डेड मावा विक्री करताना रंगेहात पकडून त्यांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांची दुकाने सील केली. याबाबत नगरच्या अन्नसुरक्षा अधिकारी प्रदिप पवार, राजेश बड़े यांनी ही कारवाई केली. 

नगर येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येथे येऊन मावा विक्रेत्यावर कारवाई करतात. मात्र, स्थानिक पोलिसाना ते दिसत नाही. येथील पोलिस ठाण्या समोरच चक्क नगरचा प्रसिद्ध मावा, खडा मावा, कडक मावा अशा पाट्या असलेल्या पंचविस तीस टपर्‍या आपल्या ग्राहकाना आकर्षित करत असतात. या टपर्‍या शेजारीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श विद्यालय आहे.   

जिल्ह्यातील निर्भय बनो उपक्रमाचे समन्वयक शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी नगर शहरातील सिताराम सारडा विद्यालयाच्या परिसरातील मावा गुटखा टपर्‍या हटविण्यासाठी खंबीर भूमिका घेतली. या रोषातून त्याच्यावर भ्याड हल्याची घटना घडल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यभरात त्याचे पडसाद उमटले. जिल्हा पोलिस प्रमुखांनी प्रत्येक पोलिस ठाण्याला सुचना देऊन देखील शाळेच्या परिसरात खुले आम सुरु असलेल्या गुटखा मावा सुंगधी सुपारीच्या टपऱ्या हटविल्या गेल्या नाहीत. त्या तातडीने हटविण्याची मागणी येथील भ्रष्टाचार व व्यसन मुक्ती समितीचे अमोल घोलप यांनी केली आहे.