शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : तालुक्यात पार पडणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी १७३ तसेच ग्रामपंचायत सदस्याच्या ९४ प्रभागातील २५३ जागासाठी १०३१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसिलच्या निवडणुक विभागातून देण्यात आली. थेट जनतेतून होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील मुंगी व खरडगाव येथे सर्वात जास्त प्रत्येकी १२ उमेदवार तर लाखेफळ येथे सर्वात कमी २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी बोधेगाव येथे सर्वात जास्त १२८ तर मडके येथे सर्वात कमी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवार दि.१६ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. पहिला दिवस निरंक तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी केवळ चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ऑनलाईन पद्धतीन उमेदवारी अर्ज भरताना वारंवार सर्वर डाऊन रहात असल्याने इच्छूक उमेदवारासह विविध राजकीय पक्षाकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करून घेण्याची मागणी झाल्याने राज्य निवडणुक आयोगाने बुधवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी ५.३० पर्यंत वाढविल्याने शेवटच्या तीनही दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले.
शुक्रवार दि.२० रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असत्याने इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. संध्याकाळी उशीरा पर्यंत इच्छुकांची धावपळ दिसून आली. तालुक्यातील दहेगावशेव, रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेची पोटनिवडणूक असून त्यात दहिगावशेच्या जागेसाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ती जागा निरंक राहिली तर रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायत सदस्याच्या जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यात पार पडणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निहाय दाखल झालेत्या उमेदवारी अर्जाची संख्या तसेच सरपंच पदासाठीची संख्या कंसात पुढीलप्रमाणे – आव्हाने बु. सदस्य ४३ तर सरपंच (७), ब-हाणपूर ३३ (६), सामनगाव १९ (५), लोळेगाव २३ (४), वडुले बु. ४५ (९) भागवत एरंडगाव २६ (५), लाखेफळ २४ (२), थाटे ३० (५), लाडजळगाव ६६ (९), दिवटे २० (३), मुंगी ६० (१२), वरुर बु. ५० (१०), भगूर २० (४), गोळेगाव ३७ (४), मडके १८ (५), खडके २१ (५), बालम टाकळी ५६ (६), बोधेगाव १२८ (१०), कन्हेटाकळी ३२ (६), हिगणगावने १९ (४), दोरसडे आंत्रे ३१ (९), शहर टाकळी ७४ (८), देवटाकळी २३ (८), खरडगाव ४७ (१२), वडुले खु. ३१ (५), समसुद एरंडगाव ३४ (४) शेकटे खु. १९ (१०).