कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव मतदार संघातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
नुकत्याच १२ वी च्या परीक्षा सुरु झाल्या असून येत्या काही दिवसात १० वीच्या देखील परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा पार पडल्यानंतर १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतांना अनेक शैक्षणिक व शासकीय दाखल्या बरोबरच जातीच्या दाखल्याची देखील गरज भासते.
जातीचा दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना सातत्याने सेतू कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा मानसिक त्रास होतो. या त्रासातून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मुक्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून मतदार संघात जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये आधार कार्ड, स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास), वडिलांचा पुरावा नसल्यास काकांचा पुरावा यामध्ये काकांचा जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला, काकांचा जातीचा दाखला (असल्यास), आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा जातीचा दाखला (असल्यास), आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा यामध्ये चुलत आजोबांचा जन्म दाखला, चुलत आजोबांचा जातीचा दाखला (असल्यास), शाळा सोडल्याचा दाखला, जन्म नोंदणीचा पुरावा, हक्क पत्र नोंद आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
या सर्व कागद पत्रांची विद्यार्थ्यानी जमवाजमव करून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कोळपेवाडी व कोपरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात जमा करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. १० वी १२ वीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या जातीच्या दाखल्यासाठी सहाय्यता शिबीर आयोजित केल्याबद्दल विद्यार्थी व पालक वर्गातून स्वागत करण्यात आले असून आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.