कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’कार्यक्रम साजरा होत असून या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी या नवरात्र महोत्सवात घेण्यात आलेल्या अनेक नवनवीन उपक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘बाई पण भारी देवा’ ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमासाठी महिलांची अलोट गर्दी होत असून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून गृहिणींना, माता भगिनींना काही आनंदाचे क्षण मिळावे यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या पुढाकारातून दरवर्षी भव्य दिव्य स्वरुपात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात काही मजेदार बुद्धिवर्धक व आकर्षक खेळ, प्रश्नमंजुषा, उखाणे अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींच्या कला, गुणांना वाव दिला जातो.
यावर्षी अनेक नवीन उपक्रमाबरोबरच ‘बाई पण भारी देवा’ ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी आकर्षक असे बक्षीसही ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रीज, द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही व तृतीय क्रमांकासाठी तीन बर्नल गॅस शेगडी त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात इतर आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी यानिमित्ताने महिला भगिनींना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिळाली आहे.
दोन वर्ष कोरोना महामारी असताना देखील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी उत्साहात साजरा होणारा नवरात्र उत्सव डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात आला होता. त्यामुळे महिला भगिनींचे या उत्सवाशी भावनिक नाते जोडले गेले आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात हा नवरात्र उत्सव सुरु झाल्यापासून या उत्सवास महिला भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला ‘बाई पण भारी देवा’ “होम मिनिस्टर” खेळ तर महिलांना अतिशय भावला असून या कार्यक्रमाला महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या उत्सवात सहभागी झाल्यामुळे कार्यक्रमस्थळी पाय ठेवायला देखील जागा शिल्लक नव्हती.
या नवरात्र उत्सवात विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना सोमवार (दि.२३) रोजी आ. आशुतोष काळे, मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याच्या पहिल्या बक्षिसांचे मानकरी कोण होणार? याबाबत महिला भगिनींमध्ये उत्सुकता पसरली आहे.