स्वार्थ न ठेवता निष्काम मनाने सेवा करा – हभप योगिराज महाराज 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २१ :  जीवनांत प्रत्येकांने नित्यनियम ठेवावा, गुरूवर श्रध्दा असावी, स्वधर्माचे पालन करा, काही मिळेल हा हेतु ठेवुन केलेली सेवा कधीही लागु पडत नाही तेंव्हा स्वार्थ न ठेवता निष्काम मनांने सेवा करा असे प्रतिपादन लखमापुर येथील रामकृष्ण भक्ती धामचे अधिपती ह.भ.प. योगिराज दादा महाराज यांनी केले.

  तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी साधनेतुन स्वतःला घडविले आणि आयूष्याच्या शेवटपर्यंत आत्मसात केलेले नियम मोडले नाही. ब्रम्हचर्य, गृहास्थाश्रम, वानप्रस्थ, आणि संन्यासी हे चार आश्रम प्रत्येकाच्या जीवनांत अत्यंत महत्वाचे आहेत. ज्या त्या आश्रमांत जे नियम असतात त्याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. क्षत्रियाचा धर्म युध्द करणे आहे मात्र महाभारतात साक्षात अर्जुन गोंधळले होते त्यासाठी कृष्ण भगवंतांने अर्जुनाला क्षत्रिय धर्माची आठवण करून दिली होती.

विद्यार्थी दशेत प्रत्येकांने ज्ञानार्जन केलेच पाहिजे त्यातुनच जीवनाचा उत्कर्ष साधला जातो. भक्तावर कितीही संकटे आली तरी त्याने संत महंतावरील निष्ठा ठेवलीच पाहिजे. आपण मनुष्ययोनीत जन्मलो तेंव्हा जीवन जगतांना कुठलाही एक नित्यनियम ठेवलाच पाहिजे. तो कधीही मोडु नये आणि काही मिळेल या अपेक्षेने तर मुळीच नियम पाळू नये असेही ते म्हणाले.