काळे कारखान्याच्या मयत कामगाराच्या वारस पत्नीस ३.४८ लाखाचा धनादेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे हंगामी (कायम) कर्मचारी स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते. व्यवस्थापनाकडून कर्मचारी/कामगारांना दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून दिलेल्या ‘नागरी सुरक्षा कवच’ च्या माध्यमातून त्यांना विमा कंपनीकडून अपघात विमापोटी३.२० लाख व वैद्यकीय खर्चापोटी २८ हजार एकून ३.४८ लाखाचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी सुनिता बाबुराव बडवर यांना देण्यात आला आहे.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असलेल्या कमवत्या व्यक्तीचे अचानकपणे होणारे निधन त्यामुळे त्या कुटुंबापुढे निर्माण होणाऱ्या अनेक अडचणीतून सावरण्यासाठी त्या कुटुंबाला वेळेवर आर्थिक मदत व्हावी. या उद्देशातून संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे यांच्या सूचनेनुसार व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला आहे.

त्यामुळे अशा अपघाती घटना घडल्यानंतर त्या कुटुंबांना दिलासा मिळत आहे. अशीच घटना कारखान्याचे कर्मचारी बाबुराव भास्कर बडवर यांचे बाबतीत घडली असून त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर कारखाना व्यवस्थापनाने विमा कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्यातून त्यांच्या वारसांना ३.४८ लाखाची नुकसान भरपाई मिळाली आहे. या नुकसान भरपाईचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी सुनिता बाबुराव बडवर यांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. सन २०२३ या वर्षात दुर्दैवाने कारखाना गेट बाहेर झालेल्या अपघाती वैद्यकीय खर्च व अपघाती निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ९ लाख ८८ हजार रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.

कर्मवीर काळे कारखाना मयत कर्मचाऱ्याच्या वारस पत्नीला ३.४८ लाखाचा धनादेश देतांना कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे.