गौतम सहकारी बँकेचा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : अहमदनगर जिल्ह्यात सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेचा मार्च २०२३ अखेरचा लाभांश सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे. खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना अनेक आवाहनांचा समर्थपणे मुकाबला करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सन २००२ नंतर फक्त २०१८ साली पहिल्यांदा व या मागील आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा सभासदांना लाभांश वाटप होत असून त्यामुळे सभासदांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

 माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी स्थापन केलेली गौतम सहकारी बँक दिवसेंदिवस प्रगतिच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आज रोजी बँक भक्कमपणे आर्थिक पायावर उभी असून चालू आर्थिक वर्षात बँकेच्या ग्राहकांसाठी एटीएम कार्डस व मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.

ज्या सभासदांचे बँकेत खाते नाहीत त्यांनी योग्य त्या केवायसीची पूर्तता करून व इतर कोठेही खाते असल्यास त्याचा तपशील बँकेत देऊन आपली लाभांशाची रक्कम घेऊन जावी असे आवाहन बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापू घेमूड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे आणि चेअरमन सुधाकर दंडवते यांनी केले आहे.