वाळू तस्करांची तलाठ्याला मारहाण, पकडलेला डंपर वाळूतस्करांनी नेला पळवून

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढली असुन एका तलाठ्याला वाळू तस्करांनी मारहान करुन पकडलेला वाळूचा डंपर पळवून नेण्यात आला आहे. तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाईसाठी तहसील कार्यालयात नेत असताना वाळू तस्करांनी रस्त्यात सदर डंपर अडवून येसगाव येथील तलाठी प्रवीण शेष डहाके यांना शिवीगाळ व मारहाण करून चक्क डंपर पळवून नेला. या घटनेमुळे महसुलसह वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

तलाठी डहाके यांनी आरोपी राजू शेख उर्फ राजा महमंद शेखसह इतर तीन अनोळखी इसमाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना गुरुवार दि.९ नोव्हेंबर सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना मिळाली. त्यानुसार भोसले यांनी महसूलचे पथक तयार केले. वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा डंपर पथकाने पकडला.

सदर डंपर अवैध वाळू तस्करी करत असल्याचे उघडकीस आले. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी म्हणून तहसील कार्यालयात घेवून जात असताना जेऊर कुंभारी शिवारातील एच पी पेट्रोलपम्प जवळ सिल्वर रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीतून आरोपी राजू शेख व इतर यांनी संगनमत करून डंपर अडवला. तलाठी डहाके यांच्या हाताला धरून डंपर मधून खाली ओढले. जर माझ्यावर कारवाई केली तर मी तुम्हाला लाचलुचपत नावाखाली अडकविल अशी धमकी देत त्यांच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमांनी डहाके यांच्या हातातील मोबाईल हिसकवून घेतला.

मोबाईल घेत असताना प्रतिकार केला असता अनोळखी इसमाने हातातील काठीने तलाठ्याला उजव्या पाय व हातावर मारून दुखापत केली. दमदाटी करत तलाठ्याच्या ताब्यातील डंपर मधली वाळू रस्त्यावर ओतून सदरचा डंपर पळवून नेला अशी माहिती तलाठी डहाके यांनी शहर पोलिसांत तक्रारीत दिली आहे. यावरून शहर पोलीस ठाण्यात राजू शेख व इतर तीन अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहे.

दरम्यान वाळू तस्करांची वाढलेली मुजोरी शासकीय कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतत आहे. तत्कालीन तहसीलदाराला लाच लुचपतच्या जाळ्यात अडकून एका वाळू तस्कराने आपली दहशत निर्माण केली त्याचेच अनुकरण इतर वाळू तस्कर करण्याच्या तयारीत आहेत का ? असा प्रश्न उद्भवत आहे. तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी वाळू तस्करांवर कठोरात कठोर कारवाई करून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा विडा उचलला आहे.