उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको
संगमनेर प्रतिनिधी, दि.१८ : रांजणगाव देशमुख निळवंडे लाभक्षेत्र हे आवर्षण प्रवर्षण ग्रस्त असून कायमच हा भाग दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पंरतु कोपरगाव तालुक्यातील एकही पाझर तलाव या पाण्याने भरला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याने या परिसरातील सर्व गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरूण देण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे प्रातिनिधिक स्वरूपात सहा जणांनी गुरूवार (दि.१६) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास पाठिंबा म्हणून कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख येथे सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. निळवंडे धरणाच्या सुरू असलेल्या चाचणीच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरून द्यावे, कालव्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी व अतिक्रमणे दूर करणे, पाझर तलाव निम्मे भरल्या नंतर सांडवा उकरून खालच्या भागातील पाझर तलावांना पाणी देणे, शेतकरी संघर्षावेळी केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव येथे निळवंडे कालव्याच्या माध्यमातून पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
या उपोषणासाठी अड. योगेश खालकर, डॉ. अरूण गव्हाणे, कैलास रहाणे, मनेगावचे सरपंच आण्णासाहेब गांगवे, संजय बर्डे आदी कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात बसले आहे. निळवंडे कालव्यांच्या द्वितीय चाचणीच्या माध्यमातून लाभक्षेत्र व दुष्काळी भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर कालव्यांना पाणी देखील सोडण्यात आले. मात्र, कोपरगाव तालुक्यातील एकही गावचे पाझर तलाव या पाण्याने भरला नाही.
त्यामुळे या भागात प्रशासना विरूद्ध मोठा रोष दिसून येत आहे. पाण्यापासून वंचित राहणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत या भागातील पाझर तलाव भरले जात नाही. तो पर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी सर्व शेतकऱ्यांनी केली. निळवंडेच्या पाण्याची वाट दुष्काळी भागातील शेतकरी गेली ५३ वर्षांपासून पाहत आहे. सहा महिन्यापूर्वी प्रथम चाचणी झाली तर १४ ऑक्टोंबरला दुसरी चाचणी सुरू झाली.
लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरले जातील अशी अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांना होती. मात्र, ही आशा फोल ठरताना दिसत आहे. १४ ऑक्टोबरला सोडलेले पाणी लाभक्षेत्रात येण्यास तब्बल आठ दिवस लागले. कालव्याची क्षमता ९०० क्युसेस असताना तो फक्त ४०० क्युसेसने चालविला गेला. कालवा जास्त क्षमतेने चालविला असता तर पृच्छ भागातील सर्वच शाखांना एकाचवेळी शक्य झाले असते. मात्र, तसे झाले नाही. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस कालवा वाहिला तरी कोणत्याही गावचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला नाही.
या दरम्यान पाणी चोरी देखील मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. संगमनेर भागातून कालवा वाहिला पंरतु कोपरगाव तालुक्यातील एकाही गावात पाणी पोहचलेच नाही. याविरूद्ध संतापाची लाट शेतकऱ्यां मध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने रांजणगाव देशमुख मध्ये बैठक घेऊन प्रशासनाविरूद्ध लढा उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीमध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.