कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : निळवंडेच्या कालव्याद्वारे पाझर तलाव भरत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार व पाणी चोरी थांबवण्यासाठी भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाबरोबर कॅमेरा देखील असणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली. या पथकामध्ये महसूल, पोलिस विभाग, जलसंपदाचे प्रतिनिधी असणार आहे. त्यांच्या सहकार्याला गावातील पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे पाणी शेवटच्या पाझर तलावात पूर्ण क्षमतेने पोहचेल असा विश्वासही आहेर यांनी व्यक्त केला.
निळवंडे कालव्याद्वारे कोपरगाव तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी रांजणगाव देशमुख येथे काही शेतकरी उपोषणाला बसले होते. यावेळी उपोषण स्थगित करताना उपोषणकर्त्यांना दिलेल्या लेखी आश्वासनानुसार आधिकारी व शेतकऱ्यांची समन्वय बैठक शिर्डी येथे सोमवारी (दि.२०) रोजी आयोजित करण्यात आली होती.
दुष्काळी भागाला पाणी पूर्ण क्षमतेने निळवंडे कालव्यावरील काही ठिकाणी असलेल्या पाईपबाबत शेतकऱ्यांनी या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत बोलताना उप-कार्यकारी अभियंता महेश गायकवाड यांनी सांगितले की, मुख्य कालवा तोडून पाणी देणे शक्य नव्हते, त्यामुळे पाईपद्वारे पाणी देण्यात आले. आता या भागात हे पाणी पुरेसे झाले असल्याने पाईप काढले जाणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्य होणार आहे.
ही बैठक उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाली असून यासाठी पोलिस उप अधिकक्षक संदिप मिटके, जलसंपदाचे उप-कार्यकारी अभियंता महेश गायकवाड, कोपरगावचे तहसिलदार संदिपकुमार भोसले, संगमनेरचे तहसिलदार धिरज मांजरे, कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, शिर्डीचे पोलिस निरिक्षक सोपान शिरसाठ, लघु पाटबंधारे विभागाचे उप-अभियंता दळवी, संबधित सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.
रांजणगाव देशमुख येथे उपोषणकर्त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार आधिकारी व शेतकरी यांच्या शिर्डी येथील बैठकीसाठी उपस्थित आधिकारी होते.
शेतकऱ्यांच्या वतीने अँड. योगेश खालकर यांनी प्रास्ताविक केले. कोपरगाव तालुक्यात तळेगाव शाखेंतून ज्या प्रमुख नाल्यांद्वारे पाणी सोडणार आहे. त्या सर्व नाल्यांच्या अडचणी व येणारे अडथळे याबाबत सविस्तर चर्चा झाली. या सर्व समस्यांबाबत शेतकऱ्यांच्या मदतीने समन्वय साधून मार्ग काढणार असल्याची माहिती आहेर यांनी दिली.
जिथे पाणी जाण्यास अडचण आहे तिथे सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये मार्ग काढला जाईल तसेच टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या पाझर तलावात पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आतातायी भूमीका घेऊ नये असे आवाहनही उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले.