नगर-नासिक जिल्ह्याला दिलासा, जायकवाडीला वाहून जाणारे पाणी वाचले – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन अधिनियम २००५ या कायद्याने संदर्भीय आदेशान्वये अहमदनगर व नासिकच्या धरणातून जायकवाडी धरणासाठी ८.०६ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. परंतु नासिक व अहमदनगर जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात रविवार (दि.२६) रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आहे.

त्यामुळे नदीपात्रात पाण्याची आवक सुरु झाल्यामुळे नदीपात्रातील वहनव्यय कमी झालेला असल्याने जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नदीमार्गातील वहनव्हयाचे (पाणी लॉस) पाणी कमी करण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांचेकडे पत्राद्वारे तातडीने केलेली होती.

सबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली होती. त्या मागणीची दखल घेवून पाणी सोडण्याबाबत कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ फेर नियोजन करण्याचे सुधारित आदेश दिले असून त्यामुळे नगर-नासिक जिल्ह्याचे जवळपास पाऊन टीएमसी पाणी वाचले असून त्यात नासिक धरणातील ४०३ दलघफु पाणी वाचले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, दि.२६/११/२०२३ रोजी गोदावरी खो-यात ५० मि.मी. ते १०० मि.मी. पाऊस झालेला आहे. त्यामुळे गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात पाणी जात असतांनी वहन तुट होणार नाही. तसेच बहुतांश धरणांमध्ये पावसाचे नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्याचप्रमाणे जायकवाडी धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे.

त्यामुळे वहन व्ययाचे पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याची मागणी मा.प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांच्याकडे व कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ केली होती. सद्य परिस्थितीची माहिती घेवून त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगर-नासिकच्या धरणातून पाणी सोडण्याचे फेर नियोजन करण्याचे आदेश सबंधित विभागाला दिले आहेत. या आदेशातून पुढीलप्रमाणे पाणी कपात करण्यात येणार आहे.

यामध्ये मुळा धरण नियोजित सोडायचे पाणी २.१० टीएमसी, प्रत्यक्षात सोडणारे पाणी १.९६ टीएमसी, वाचणारे पाणी ०.१४० टीएमसी, प्रवरा धरण नियोजित सोडायचे पाणी ३.३६ टीएमसी, प्रत्यक्षात सोडणारे पाणी ३.१४ टीएमसी, वाचणारे पाणी ०.२२० टीएमसी, गंगापूर धरण नियोजित सोडायचे पाणी ०.५० टीएमसी, प्रत्यक्षात सोडणारे पाणी ०.३५ टीएमसी, वाचणारे पाणी ०.१५० टीएमसी, गोदावरी दारणा धरण नियोजित सोडायचे पाणी २.६४३ टीएमसी, प्रत्यक्षात सोडणारे पाणी २.३९ टीएमसी, वाचणारे पाणी ०.२५३ टीएमसी असे एकून ०.७६३ टीएमसी पाणी वाचणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

वेळीच सजग राहून नगर-नासिकच्या धरणातील पाणी जायकवाडी सोडू नये. यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना हे यश मिळाले असून वाचणाऱ्या पाण्यातून नगर-नासिकच्या धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.