पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्च्याचा ईशारा

शेवगाव पाणी प्रश्नासाठी मनसेही उतरली मैदानात

शेवगाव प्रतिनिधी, दि.३० : शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वसुधा सावरकर व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना निवेदन देऊन आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या कित्येक दिवसांपासून शेवगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अनेक भागांत दहा ते बारा दिवसांनी पाणी सुटते यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते. प्रभाग क्रमांक ७ मधील महीलांनी वसुधा सावरकर व तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली सविता भुजबळ, शैला बडधे, रुपाली क्षिरसागर, सिंधुबाई लोखंडे, बेबी मरकड, सुमन शेळके, मुक्ता पानखडे, शितल तुपे, ज्योती नांगरे, अनिता गुणवंत, गिता नांगरे, मिरा भडके, मनिषा मरकड आदी महिलांच्या शिष्टमंडळांने मुख्याधिकारी सचिन राऊत यांची भेट घेऊन महिलांच्या पाण्याबाबतच्या व्यथा मांडल्या.

कित्येक सर्वसामान्य कुंटूंबाकडे इतके दिवस पाणीसाठा करण्याकरिता व्यवस्था नसल्याने नागरिक घरात टाक्या, बकेट, भांड्यांमध्ये पंधरा दिवस पाणी साठवून ठेवतात. साठलेल्या उघड्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास, अळ्या होत असून नागरिकांना डेंग्यूची बाधा हाेत आहे. नविन पाणी पुरवठा योजनेचे सत्य नगरपरिषदेने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असुन टक्केवारीच्या व मलिद्याच्या खेळात सर्व सामान्य शेवगावकरांना वेठिस धरण्याचे काम किमान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तरी करू नये.

सामान्य शेवगावकर अंत्यत सहनशील असुन त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहु नये. ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याने येत्या आठ दिवसात यात सुधारणा न केल्यास शहरातील महिला भगिनींच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला. यावेळी अनेक महिला निवेदनात उपस्थित होत्या.