कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : वृध्दाश्रमांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. आजची तरूण पिढी ही मोबाईलच्या विळख्यात अडकली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणवाच्या प्राथमिक गरजा होत्या. मात्र, आजमितीला संस्कारक्षम पिढी घडणे ही काळाची गरज बनली असुन संजीवनी शैक्षणिक संकुलात संस्कारक्षम पिढी घडत असल्याचे एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील उपलब्धींवरून जाणवते, असे गौरवोद्गार शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी काढले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांताधिकारी आहेर यांनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर (नॉन-अकॅडमिक) ज्ञानदेव सांगळे, प्राचार्य डॉ.गोरखनाथ गायकवाड, उपप्राचार्य कैलास दरेकर उपस्थित होते.
आहेर पुढे म्हणाले की, खरे संस्कार हे शालेय व महाविद्यालयीन जीवनातच घडत असतात. ज्ञानाबरोबरच संस्कारही तितकेच महत्वाचे आहे, तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यही महत्वाचे आहे. जो खेळाडू असतो, तो जीवनात हार जीत पचवतो. अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुमित कोल्हे म्हणाले की, संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशिल असते.
विद्यार्थ्यांच्या बौधिक विकासाबरोबरच शारीरिक प्रगतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. आगामी काळात विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी सज्ज व्हावे, यासाठी कोटा येथिल तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच नेमबाजी नैपुण्य वाढीस लागावे यासाठी संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये शुटींग रेंज उभारली जाणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांनी प्रशिक्षण दिलेल्या अॅकॉडमी मार्गदर्शनाखाली शुटींग रेंज साठी आंरराष्ट्रीय दर्जाच्या बंदुका व इतर साहित्य उपलब्ध केले जात असल्याची माहितीही यावेळी सुमित कोल्हे यांनी दिली.
विद्यालयाच्या क्रीडांगणावर कबड्डी, खो खो, फुटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, स्वीमिंग, इनडोअर गेम्स, इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चुरशीने संपन्न झालेल्या स्पर्धेत शहिद भगतसिंग हाऊसने मानाचा कप पटकाविला. समारंभाचे प्रास्तविक संतोष सुर्यवंशी यांनी केले. उपप्राचार्य दरेकर यांनी आभार मानले.