पाणी योजनांशी संबंध नसतांना माजी आमदार कोल्हेंनी फुकटचे सल्ले देऊ नये – रावसाहेब चौधरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : कोपरगाव शहरासह मतदारसंघातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी १३१.२४ कोटी व ग्रामीण भागातील ७० पेक्षा जास्त गावांसाठी २७० कोटीचा निधी आणला आहे. 

त्यामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण झाले असून कित्येक पाणी पुरवठा योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, ज्यांना त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न सोडविता आला नाही, ज्यांचा या पाणीपुरवठा योजनांशी काडीचाही संबंध नाही त्यांनी फुकटचे सल्ले देऊ नये अशी टीका पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी यांनी माजी आमदार कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

कोपरगाव मतदार संघातील धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावातील नागरिकांचा मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून मार्गी लागला असून या पाचही गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या प्रगती पथावर आहे. 

या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असलेल्या ठिकाणी माजी आमदारांनी पाणीपुरवठा योजनेचे काम आपणच मार्गी लावले असल्याच्या अविर्भावात अधिकाऱ्यांना सल्ले देवून श्रेयवादासाठी बातम्या प्रसिद्ध करून काडीचेही योगदान नसतांना पाहणीच्या नावाखाली या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड केली त्याबद्दल चौधरी यांनी टीका केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, या पाच गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेवून आ.आशुतोष काळे यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याचा फायदा उचलत शासन दरबारी पाठपुरावा करून व वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून या पाच गावच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेसाठी २९.६२ कोटी निधी मिळविला आहे.

आज रोजी या पाणी पुरवठा योजनेचे काम शीघ्र गतीने सुरू असून लवकरच काम पूर्ण होवून धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना देखील त्यांना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावता आले नाही.

त्यांना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर प्रत्येक काम आम्ही केल्याचे सांगत न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे. सत्ता असतांना काम करता आले नाही आणि आता सत्ता नसतांना हे काम मी केले, ते काम मी केले असे सांगून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे काम सध्या सुरू असून त्यांनी धारणगाव, जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हाण,  मुर्शतपूरसह पाच गावांच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे पाहणीच्या नावाखाली श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

उद्या न जाणो ७० गावातील कित्येक पाणीपुरवठा योजनेच्या सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जावून पाहणीच्या नावाखाली श्रेय घेण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेशी काडीचाही संबंध नसतांना फुकटचे सल्ले देवू नका असा खोचक सल्ला रावसाहेब चौधरी यांनी माजी आमदार कोल्हेंना नाव न घेता दिला आहे.