शालेय जीवनाचा काळ हा भवितव्याचा पाया

शेवगाव प्रतिनिधी, दि.०२ :  प्रत्येकाला आपल्या मुलामुलीनी डॉक्टर, इंजिनिअर, मोठा महसूल वा पोलिस अधिकारी व्हावे अशी इच्छा असते. पालकाच्या या इच्छां अपेक्षांचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांवर ठाम राहून स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्याचीच निवड करावी, शालेय जीवनाचा काळ हा भवितव्याचा पाया असून याकाळात एकाग्रतेने अध्ययन करून व सहशालेय उपक्रमात सहभाग घेत स्वतःचा शोध घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी केले.

येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलमध्ये ग्रेट भेट या उपक्रमात पर्यवेक्षक उमेश घेवरीकर यांनी त्यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी कदम यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक बदल, ध्येय निश्चिती, मराठी शाळांचे भवितव्य, पालकांची संभ्रमित अवस्था, नेट अडिक्शन, जनसंपर्क अशा विविध मुद्द्यावर भाष्य करत विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. नवीन वर्षाची सुरुवात प्रेरणादायी व्यक्तींच्या संवादाने झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांनी व पालकांनी व्यक्त केले. संस्थेचे उपसचिव हरीश भारदे यांच्या हस्ते पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीराम, प्राचार्य शिवदास सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन मालानी यांनी प्रास्तविक केले तर सचिन शिरसाठ यांनी आभार मानले.