महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होने ही स्त्री शक्तीची क्रांती – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : अनेक उद्योजकांनी, मोठमोठ्या कंपन्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर शून्यातून नवनिर्मिती करत गगनभरारी घेतल्याची उदाहरणे आहेत. अनेक महिलांनी छोट्या गृहउद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत मजल मारली आहे. कोपरगाव तालुक्यात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सरकारने महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या असून, महिलांनी या संधीचा फायदा घेऊन उद्योग-व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. कोणत्याही संकटाला न घाबरता आत्मविश्वासाने व धैर्याने परिस्थितीला सामोरे जाऊन काम करावे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

स्नेहलता कोल्हे यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील राजगिरा लाडू व चिक्की उत्पादित करणाऱ्या कालांश महिला गृहउद्योगाला भेट दिली. यावेळी कोल्हे यांच्या हस्ते कालांश उद्योगातील उत्कृष्ट महिला कामगार निर्मला वैद्य, शोभा राठोड, अकोलकर, तारा पेंढारे, प्रतिभा पाटील, कविता धारक, अश्विनी गायकवाड, ज्योती पवार, सरला जाधव, वंदना शिंदे, ज्योती मोरे, जयश्री खानापुरे आदींचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी कोल्हे यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी ‘कालांश उद्योग’चे संस्थापक रोहित काले, रेणुका काले, विनय काले यांनी स्नेहलता कोल्हे यांचे स्वागत करून ‘कालांश’ च्या विविध उत्पादनांची माहिती दिली. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दगुराव चौधरी, संचालक रमेश घोडेराव, दीपक चौधरी, सरपंच वरुणा चौधरी, उपसरपंच गणेश थोरात, रमाकांत वाकचौरे, सोपानराव वहाडणे, संपतराव वहाडणे, दीपक सुरे, अंबादास देवकर, संदीप चौधरी, संदीप थोरात, दीपक वाघ, ‘कालांश उद्योग’चे व्यवस्थापक उमेश मोरे, ललित केदारी, कुणाल नेरकर, योगेश वाडेकर आदींसह महिला बचत गटाच्या सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्नेहलता कोल्हे यांनी महिला कामगारांसोबत बनवले तिळाचे लाडू याप्रसंगी स्नेहलता कोल्हे यांनी कालांश उद्योगातील महिला कामगारांशी संवाद साधत त्यांच्यासोबत स्वत:च्या हाताने तिळाचे लाडू तयार केले. महिला बचत गट चळवळीत काम करताना आलेले अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या, कोपरगाव तालुक्यात संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून असंख्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीला मोठा हातभार लावता आल्याचे आपणास मनस्वी समाधान आहे.

रोहित काले व रेणुका काले यांनी वेगळी वाट निवडून कालांश हा महिला गृहउद्योग सुरू करून या उद्योगात महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, ‘कालांश उद्योग’च्या वतीने तयार केल्या जाणाऱ्या राजगिरा लाडू, चिक्की, तिळाचे लाडू यांची चव, दर्जा अतिशय उत्तम आहे. काले यांनी या उद्योगात स्वच्छता, टापटीपपणा व दर्जा यांना प्राधान्य दिले आहे.

कालांश उद्योगातील महिला कामगार परिश्रमपूर्वक व निष्ठेने काम करत आहेत. रोहित काले व रेणुका काले यांनी कालांश उद्योगाच्या रूपाने लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. पाच महिलांपासून सुरू झालेल्या कालांश उद्योगात आज सत्तर-ऐंशी महिला काम करत आहेत. कालांश उद्योगाने अल्पावधीत केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. या उद्योगास भेट देऊन मला खूप आनंद वाटला. 

मुंबईत सात महिलांनी ६५ वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ साली एकत्र येऊन घरगुती स्वरुपात सुरू केलेल्या ‘लिज्जत पापड’ च्या गृहउद्योगाने इतिहास घडविला आहे. ‘लिज्जत पापड’ या छोट्या व्यवसायाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असून, आज जगभरात ‘लिज्जत पापड’ चा ब्रॅंड पसरला आहे. कालांश उद्योगासही असेच मोठे यश मिळावे व त्यांच्या उत्पादनांची कीर्ती देश-विदेशात पसरावी, अशा शुभेच्छा कोल्हे यांनी दिल्या. प्रत्येकाने एकमेकांना साथ दिली आणि जिद्द व चिकाटीने काम केले तर यश नक्कीच मिळते. कोपरगाव तालुक्यातील उद्योजकांनी औद्योगिक क्षेत्रातही कोपरगावचा नावलौकिक वाढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.