कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ : महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करुन दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला असून या अनुदानासह दुग्ध व्यवसायातील इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादकांनी शासनाच्या भारत पशुधन अॅपवर आपली नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांनी केले.
गोदावरी खोरे नामदेव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर कोपरगाव व राहाता तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, कृत्रिमरेतन तज्ज्ञ यांच्यासाठी भारत पशुधन अॅपबाबत माहिती देण्यासाठी नुकतेच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. तुंबारे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा कृत्रिमरेतन केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, कोपरगाव तालुका लघू पशुचिकित्सालयाचे सह आयुक्त डॉ. अनिल तांबे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, राहाता येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन वेंदे, कोपरगाव पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रध्दा काटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. जामदार, बायफ संस्थेच्या कोपरगांव कार्यालयाचे अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर, बायफचे डॉ. सचिन वाघमारे, गोदावरी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पशुसंवर्धन विभागाबाबत केंद्रस्तरावरुन अनेक नवनवीन योजना व उपक्रम राबविले जात आहेत. माणसाप्रमाणेच जनावरांचीही ओळख निर्माण व्हावी या हेतुने नवी पध्दत आमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी भारत पशुधन अॅप ही नवीन संगणक प्रणाली सुरु करुन त्यावर शेतकऱ्यांकडील जनावरांच्या नोंदी करण्यात येणार आहेत असे सांगून डॉ. तुंबारे यांनी भारत पशुधन अॅपवर नोंद केल्यावर दूध उत्पादकांना शासनाच्या पाच रुपये अनुदानाचा लाभ तर मिळेलच परंतु या ऑनलाईन नोंदीमुळे जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरांच्या खरेदी विक्रीची माहिती, जनावरांची जात आदी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती संकलीत करुन त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने कामास सुरुवात केलेली आहे.
त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व कृत्रिमरेतन तज्ज्ञांच्या गांवोगावी नेमणुका केल्या असून त्यांच्यामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील पशुधनाची माहिती भारत पशुधन अॅपवर नोंदवून घ्यावी असे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पदकांना आवाहन करताना सांगितले की, भारत पशुधन अॅप ही दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील एक क्रांती असून भविष्यात संगणक प्रणालीशिवाय पर्याय नाही, जनावरांचे संरक्षण, त्यांची निगा, या व्यवसायासाठीच्या शासनाच्या योजना, सवलती थेट दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याकडील जनावरांच्या नोंदी या अॅपवर समाविष्ट करणे गरजेचे आहे.
जनावरांचे टॅगींग करून त्यानुसार नंबर देण्यात येणार आहे. अलर्ट पर्यायामध्ये पशुपालकांना लसीकरण, कृत्रिम गर्भधारणा पध्दत, जातीवत वळुंचे वीर्य, सीमेन याबाबतची माहिती देखील या अॅपद्वारे घरबसल्या उपलब्ध होणार आहे. भारत पशुधन अॅपमुळे कामात सुसूत्रता येत असून कामाचा उरक वाढत आहे. या व्यवसायातील नियोजन करणे, धोरणात्मक निर्णय घेणे शक्य होत असल्याने या सर्व बाबींचा विचार करुन दूध उत्पादकांनी आपल्याकडील पशुधनांची नोंदणी तातडीने करुन घ्यावी असे आवाहनही परजणे यांनी केले.
डॉ. वसंत गारुडकर यांनीही भारत पशुधन अॅपबाबत प्रशिक्षणातून सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कोपरगाव तालुका लघू पशुचिकित्सालयाचे पशुधन वैद्यकीय अधिकारी, बायफ संस्थेचे अधिकारी व कृत्रिमरेतन तज्ज्ञ यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.