कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : कोपरगाव तालुक्यातील धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, चांदगव्हाण व हिंगणी या पाच गावांच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेचा विद्यमान आमदारांच्या वडिलांच्या कार्यकाळात खेळखंडोबा झाला होता. ही योजना मार्गी लावण्यासाठी स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मंत्रालय स्तरापर्यंत पाठपुरावा केल्याचे माझ्यासह आम्ही पाचही गावचे नागरिक साक्षीदार आहोत. ज्यांनी या योजनेत खोडा घालण्याचे पाप केले तेच आता कोल्हे यांच्यावर बिनबुडाची टीका करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असा पलटवार धारणगावचे माजी उपसरपंच दीपक चौधरी यांनी केला आहे.
रावसाहेब चौधरी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दीपक चौधरी यांनी म्हटले आहे की, धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, चांदगव्हाण व हिंगणी या गावातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. गेली अनेक वर्षे रखडलेली या पाच गावाची संयुक्त पाणीपुरवठा योजना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर जल’ योजनेमुळे मार्गी लागत आहे. पाणी हा आमचा दैनंदिन जीवनाचा विषय असून, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘हर घर जल’ योजना राबविली जात असून, जलजीवन मिशनअंतर्गत नगर जिल्ह्यातील व राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन लोकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. धारणगाव व परिसरातील इतर चार गावांतील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून २९ कोटी ६२ लाख रुपये खर्चाची संयुक्त पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी सहकार्य केले.
कोल्हे परिवार अशा कामांचे राजकारण कधीच करीत नाही. उलट काळे गटच अशा न केलेल्या विकास कामांचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. या पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे; पण सध्या ज्या गतीने या योजनेचे काम सुरू आहे. ते पाहता अजून किती दिवस आम्हाला पाण्यासाठी वाट पाहावी लागेल हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे संथ गतीने चालू असलेल्या या योजनेच्या कामाची स्नेहलता कोल्हे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली व या कामात काही अडचणी आल्यास त्या शासनदरबारी मांडून सोडविणार आहेत.
यात त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही किंवा राजकारणही केले नाही; परंतु दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रत्येक कामात राजकारणच दिसते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या नावाने टीका करून आपली बालिश प्रसिद्धीची हौस भागवून घेतल्याचे दिसून येते. विद्यमान आमदारांना गेल्या चार वर्षांत ही पाणी योजना पूर्ण करन्यासाठी मदत करता आली नाही. असेच अनेक ठिकाणी त्यांच्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. मतदारसंघात कसलेही ठोस विकास काम न करता ते विकास केल्याचे खोटे सांगत आहेत.
त्यांच्या खोट्या प्रचाराला व जाहिरातबाजीला जनता पुरती कंटाळली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपला निसटता विजय झाला आहे. याचा त्यांना विसर पडला असून, येणाऱ्या काळात तो ही नशिबी नसेल त्यामूळे संपूर्ण मतदारसंघ आपल्याच नावावर आहे, अशा अविर्भावात त्यांनी वावरू नये. एकाच कामाचे चार-चार वेळा फ्लेक्स-बोर्ड लावून जाहिरात करतात व स्वत: न केलेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. त्यांची आमदारकी शेवटची घटका मोजत असताना धारणगावात आमदार निधीतून अजून साध्या एका दिव्याचा उजेड पडलेला नाही.
त्यांच्या वडिलांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात या पाणीपुरवठा योजनेचा विचका झाला नसता तर केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे काम आपणच करतोय, अशी आपल्या बगलबच्च्यामार्फत खोटी प्रसिद्धी करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. विद्यमान आमदारांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली असती तर त्यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देणे त्यांना सहज शक्य झाले असते; पण त्यांनी याकडे सतत दुर्लक्षच केले.
कुठलाच अभ्यास न करता फक्त प्रसिद्धी करून मिरवायचे हे जास्त काळ चालत नाही. हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा टोला दीपक चौधरी यांनी आ. काळे यांचे नाव न घेता लगावला आहे. ज्यांच्या नावाने आमदारांनी स्नेहलता कोल्हे यांच्यावर या योजनेसंदर्भात टीका केली. त्या रावसाहेब चौधरी यांचा भ्रष्टाचाराचा इतिहास परत एकदा तपासावा. ज्यांनी धारणगावची पंचवीस लाख रुपये लोकवर्गणी फस्त केली हे आमदारांना ठाऊक नसावे त्यामुळे त्यांना कोल्हे यांच्याबद्दल बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही, असे सांगून दीपक चौधरी म्हणाले, युवा नेते विवेक कोल्हे आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर तालुक्यातील तरुण, वयस्कर माता-भगिनी यांना आपलेसे वाटतात.
त्यांची तालुक्यात वाढत चाललेली लोकप्रियता बघता काळे यांना आपण पुन्हा आमदार होणार नाही, याची खात्रीच पटल्यामुळे आपण कोणाच्या नावाने कोल्हे यांच्यावर टीका करण्यास सांगतो याचे भान आमदारांना राहिलेले नाही. केंद्रातील भाजपच्या सरकारने पाणी योजना दिली म्हणून विद्यमान आमदारांनी आपल्या बगलबच्च्यांच्या नावाने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा या पाणी योजनेचे काम कसे लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी मदत करणे तर दूरच पण श्रेय घेण्यासाठी त्यांची पोटदुखी सुरू आहे. तालुक्यातील कोणतेही काम आपणच मंजूर केले अशी जाहिरात करून स्वतःचे हसू करून घेऊ नये, असा सल्लाही दीपक चौधरी यांनी आ. काळे यांना दिला आहे.