कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : माझ्या आजीला गो-सेवेची व गोपालनाची अत्यंत आवड होती. त्यामुळे आमच्या येथे मागील चार ते पाच दशकापासून आजतागायत गो-पालन केले जात आहे. गोसेवेची व गोपालनाची आवड असल्यामुळे स्व.माई आजीला श्री क्षेत्र सराला बेटाविषयी देखील धार्मिक ओढा होता. त्याच श्री क्षेत्र सराला बेटावर असलेल्या स्व.माई आजीच्या नावाने गो-शाळेचे नूतनीकरण करण्याच्या माध्यमातून श्री क्षेत्र सराला बेटाची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे परमभाग्य असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
परमपूज्य सदगुरु, योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान, क्षेत्र सराला बेट येथे परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महारांज यांची १२१ व्या पुण्यतीथीचे औचित्य साधत स्व. सुशीला शंकरराव काळे गो-शाळेचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते बुधवार (दि.१०) रोजी करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जात असून गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे २०० वर्षांपासुनची परंपरा असलेल्या श्री श्रेत्र सराला बेटात गो-सेवेचा व गोपालनाचा वारसा देखील अंखडपणे जपला जात असून त्याबाबत ब्रम्हपुराणातही देखील उल्लेख असल्याचे सांगितले आहे. माझी आजी स्व. सुशिला काळे यांना देखील गो-सेवेची व गोपालनाची खुप आवड असल्यामुळे मागील चव्वेचाळीस वर्षापासून सुरु केलेले गोपालन आजतागायत अविरतपणे सुरु आहे.
महंत रामगिरीजी महाराजांनी या तीर्थक्षेत्राच्या भौतिक विकासाचे कार्य हाती घेतले असून अतिशय सुक्ष्म नियोजन, सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन, शिस्तबद्धपणा यासर्व गोष्टी सांभाळत त्यांच्या हातून या तीर्थक्षेत्राचा सर्वांगिण विकास साकारला जात आहे. श्री श्रेत्र सरला बेटाची सेवा करण्याचे भाग्य कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व आजी स्व. सुशिला काळे यांच्या प्रमाणे माजी आ. अशोक काळे यांना देखील मिळाली आहे.
त्याप्रमाणे श्री श्रेत्र सराला बेटाच्या विकास कार्यात या तीर्थक्षेत्रावरील गो-शाळेचे नुतनीकरण करण्यासाठी महंत रामगिरीजी महाराजांनी मला सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. श्री श्रेत्र सरला बेटाचे व महंत रामगिरीजी महाराजांचे आशिर्वाद सदैव कोपरगाव मतदार संघातील जनतेवर व काळे परीवारावर राहतील अशी आशा आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी महंत रामगिरीजी महाराजांनी गो-सेवेचे महत्व विशद करतांना सांगितले की, गो-सेवा अतिशय महत्वाची असून अनेक ग्रंथातून गो-सेवेचे विशेष महत्व सांगितले आहे. गीतेतून भगवान श्री कृष्णाने गायी चारल्या असून सदगुरु गंगागिरी महाराजांनी देखील गायी चारल्या असल्याचे सांगितले. याप्रसंगी संत, महंत, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्रजी बर्डे, सर्व संचालक, विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.