जनसेवा फाउंडेशन कडून नगर दक्षिण मतदार संघातील कुटुंबीयांना मोफत साखर – राधाकृष्ण विखे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ :  दीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि.२२) संपन्न होत आहे. या दिवशी घराघरात रोषणाई करून हा उत्सव दिवाळी सारखा साजरा करावयाचा आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन कडून नगर दक्षिण मतदार संघातील सर्व कुटुंबीयांना मोफत साखर वितरण सुरू आहे.

हा सोहळा शेवगाव शहरातील जे कुटुंबीय आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करतील अशा शहरातील प्रत्येक प्रभागातील एका कुटुंबातील दोन सदस्यांना अयोध्या दर्शन घडविण्याचे खासदार सुजय विखे यांनी जाहीर केले. येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात तसेच मिरी रस्त्यावरील ममता लॉन्स येथे पार पडलेल्या मोफत साखर व हरभरा डाळ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

आ.मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमास शहराच्या विविध प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी होती. खा. विखे म्हणाले, पद्मश्री विठ्ठल विखे, लोकनेते बाळासाहेब विखे, जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह विखे परिवारावर जनतेने सतत प्रेम केले असून आम्ही देखील जनतेचा विश्वास प्राप्त केला असून आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनता सुखी व आनंदी राहावी अशीच लोकप्रतिनिधीची भावना असते.

त्यामुळे मोफत साखर वाटपातून आमचा राजकारण करण्याचा कोणताही प्रयत्ननाही आमची साखर ज्यांना कडू लागत असेल त्यांनी जनतेला मोफत लाडू वाटावेत त्याला आमचा आक्षेप असण्याचे कारण नाही. ज्या समाजामुळे आम्हाला वैभव मिळाले त्या समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली त्यातून उतराई होण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आ.राजळे म्हणाल्या, पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयोध्या येथे राम मंदिर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित होत आहे. हा सोहळा जनतेच्या दृष्टीने आनंदाचा क्षण असल्याने त्या सोहळ्यासाठी प्रत्येक घरातून डाळीचे लाडू प्रसाद म्हणून गेले पाहिजेत. या हेतूने जनतेला साखर आणि डाळीचे वाटप करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी कार्यक्रमात विविध प्रभागातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे देखील वितरण करण्यात आले. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, माजी नगरसेवक महेश फलके, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, प्रा.नितीन मालानी, बाळासाहेब कोळगे, गणेश कोरडे, राहुल बंब, नवनाथ फासाटे, यांच्यासह विविध प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक सागर फडके यांनी आभार मानले.