१५ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस – डेप्युटी कमांडट अमित कुमार

 संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये भारतीय सैन्य दिवस साजरा

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : भारत देश सुमारे १५० वर्षे  ब्रिटिशांच्या जोखडात होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लष्कर  प्रमुख ब्रिटिश वंशाचे होते. तथापि, १९४९ मध्ये शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर गेल्यानंतर, त्यांची जागा एका भारतीयाने घेतली. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख बनले. त्यांनी १५ जानेवारीलाच पदभार स्वीकारला. देशाच्या लष्कराचे  नेतृत्व एका भारतीयाच्या हाती आलेला हा दिवस इतिहासात खुप महत्वाचा होता. म्हणुनच हा दिवस भारतीय सैन्य दिवस म्हणुन संपुर्ण भारतभर साजरा करण्यात येतो, असे प्रतिपादन सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट अमित कुमार यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल अँड ड ज्युनिअर कॉलेज मध्ये आज ‘भारतीय सैन्य दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अमित कुमार बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्यासपीठावर डायरेक्टर (नॉन अकॅडमिक) ज्ञानदेव सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर,  वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर उपस्थित होते.

सर्व प्रथम शहिद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचेही पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

अमित कुमार यांनी विध्यार्थ्यांना सांगीतले की, ज्या क्षेत्रात कार्य कराल तेथे शाळेचा नावलौकिक होईल असे वर्तन करा. आपण ज्यांना आदर्श मानतो, त्यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवुन वाटचाल करा. स्वतःचे अनुभव कथन करताना त्यांनी सांगीतले की, सात वेळा आतंकवादी हल्ले परतुन लावण्यात यश  आले. हे समन्वयाने शक्य झाले. तसेच तुम्हीही योग्य समन्वय जीवनात साधा. विध्यार्थ्यांनी बॅण्डच्या तालावर केलेल्या शिस्ततबध्द संचलनाचे कौतुकही त्यांनी केले.  

  अध्यक्ष स्थानावरून बोेलताना सुमित कोल्हे यांनी स्व. कोल्हे यांचे संकल्पनेतुन स्थापन झालेल्या प्रि कॅडेट सेंटरच्या माध्यमातुन अनेक जवान देशाच्या  संरक्षणासाठी दिल्याचे सांगीतले. तसेच सैनिकी शाळेतुन सैन्य दलात झालेल्या माजी विध्यार्थ्यांचीही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, सैनिकांचे अनुभव ऐकायला छान वाटतात, परंतु काश्मीर सारख्या ठिकाणी बर्फात काम करणे किती अवघड असते, याची कल्पना आपण करू शकत नाही. संतोष सुर्यवशी यांनी सुत्रसंचालन केले तर प्राचार्य दरेकर यांनी आभार मानले.