अयोध्येला जाणाऱ्या साधू-संतांचे आमदार काळे १७ जानेवारीला करणार पूजन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांचे पूजन आ. आशुतोष काळे करणार आहेत. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार (दि.१७) रोजी सायंकाळी ०६ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Mypage

प्रभू श्रीराम हे आपल्या देशातील कोट्यावधी भारतीयांचं आराध्य दैवत आहेत. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये २२ जानेवारी २०२४ हा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाणार आहे. कारण या दिवशी मागील पाच शतकानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अयोध्या नगरीत जय्यत तयारी सुरू आहे. या भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळ्यासाठी देशभरातील अनेक संत-महंतांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले असून अभूतपूर्व असणाऱ्या या सोहळ्याची सर्वजण आतूरतेने वाट पाहत आहेत.

Mypage

यामध्ये कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांना देखील निमंत्रण देण्यात आली आहेत. यामध्ये परमपूज्य सदगुरु, योगीराज श्री गंगागिरीजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र सराला बेटचे उत्तराधिकारी ह.भ.प. रामगिरीजी महाराज व श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पु.रमेशगिरिजी महाराज तसेच मतदार संघातील साधू-संतांचे कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे विधिवत पूजन करणार आहेत.

Mypage

त्या निमित्ताने इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड देखील या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सुरेल आवाजात प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणार आहे. तसेच सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती गौरी पगारे व सुरभी कुलकर्णी या गायिका देखील उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणार आहेत. या कार्यक्रमासाठी तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mypage