कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : तब्बल पाच शतकानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिर स्थापनेचा सुवर्ण दिवस येत्या २२ जानेवारीला उगवला असून अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य दिव्य सोहळ्यात प्राणप्रतिष्ठा या दिवशी करण्यात येणार आहे. हा क्षण प्रत्येक श्रीराम भक्तांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक श्रीराम भक्ताला उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे तमाम श्रीराम भक्तांनी प्रत्येक मंदिरात २२ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत. घरासमोर रांगोळी काढून, श्रीराम ज्योती लावून दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला चरणस्पर्श करून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने आलेल्या पवित्र मंगल अक्षदा व श्रीराम मंदिराचे छायाचित्र देवून प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना मकर संक्रातीचे दिवशी दिले आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेत नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देवून थोरा-मोठ्यांचे तिळगुळ घेवून आशिर्वाद घेतले. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, श्रीराम भक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असलेले प्रभू श्रीराम २२ जानेवारी रोजी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात मंत्रघोषात विराजमान होणार आहे.
हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची प्रत्येक श्रीराम भक्ताची मनस्वी ईच्छा आहे. परंतु श्रीराम भक्तांचा उत्साह आणि संपूर्ण देशभर झालेले श्रीराममय वातावरण त्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम भक्तांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सोहळ्यासाठी सर्व श्रीराम भक्तांना व भाविकांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी ‘माझे गाव, माझी अयोध्या’ या संकल्पनेनुसार भाविकांनी घरोघरी प्रभू श्रीरामाच्या फोटोचे पूजन करावे. तसेच बुधवार (दि.१७) रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांचे पूजन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
या भक्तीमय सोहळ्याच्या दिवशी आपल्या घरापुढे व परिसरात रांगोळ्या काढाव्यात. घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा व रात्री घरासमोर श्रीराम दिप लावून दीपोत्सव साजरा करावा. आपले गाव व परिसरात श्रीराम भक्तांनी धार्मिक कार्यक्रम आयोजित करून आपल्या जवळच्या मंदिरात महाआरती करावी. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर २३ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जावे असे आग्रहाचं निमंत्रण आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिले. यावेळी नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे निमंत्रण स्वीकारून त्यांना अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली.