कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : देशासह जगातील रामभक्तांना प्रभू श्रीरामा अयोध्या नगरीचे वेध लागले आहेत. येत्या २२ जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना नव्या भव्य मंदीरात होणार असल्याने संपूर्ण अयोध्या नगरी उजाळून निघाली आहे. श्रीरामाने चौदा वर्षे वनवास भोगला तो केवळ आपल्या वडीलधाऱ्यांचा सन्मान म्हणून, पण त्या श्रीरामांच्या भक्तांना अयोध्येत राम मंदीर व्हावे. यासाठी तब्बल पाचशे वर्षे संघर्ष करीत वनवास सोसावा लागला. आज श्रीरामाची अयोध्या उजळली आणि कारसेवकांच्या आठवणींना उजाळा मिळतोय.
१५ व्या शतकापासून अयोध्येत राम मंदीर झाले पाहिजे तो ढाच्या पाडला पाहिजे यासाठी पाचशे वर्षे संघर्ष सुरु होता. सर्वात मोठा संघर्ष सन १९९२ साली झाला आणि हजारो कारसेवक, हिंदूत्ववादी स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता धर्माच्या अस्मितेवर लागलेला कलंक पुसण्यासाठी तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारच्या गोळ्या छातीवर झेलत संबंधीत ढाचा पाडला. त्यावेळी शेकडो कारसेवकांचा मृत्यू झाला. अनेकांना शरयु नदीने पोटात सामावून घेतले.
कारसेवकांच्या बलिदानामुळे आज अयोध्या नगरी उजळली म्हणुनच कोपरगावसह देशभरातील कारसेवकांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. कोपरगाव तालुक्यातील ५० ते ६० कारसेवक व हिंदूत्ववादी स्वयंसेवक अयोध्येत गेले होते. केवळ धर्मनिष्ठा मनी बाळगून कोपरगावचे कारसेवक गेले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही कोपरगावचे काही कारसेवक ढाच्याच्या दिशेने जावून श्रीरामाचा जयघोष केला होता.
पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. रानावनात राहीले. राम भक्तीसाठी शक्ती पणाला लावणाऱ्या करसेवकामध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, विनीत वाडेकर, रविंद्र बागरेचा, शंकर कडू, जगदीश दुशिंग, सोमनाथ शिंगाडे, हिरालाल तवरेज, निलेश दगडे, कृष्णा कोसंदल, नंदू गवते, दत्ता पुंड, वसंत जाधव यांच्यासह अनेक कारसेवकांचा सामावेश आहे.
हे कारसेवक श्रीराम मंदीर उभारण्याच्या संघर्षा पासुन ते नव्याने राम मंदीर उभारण्या पर्यंतचे साक्षीदार ठरले आहेत. तर स्व.मनील वायखिंडे, स्व. नितीन कानडे, स्व.बाळू पगारे, स्व.किरण गवळी, स्व.संजय उमाजी जगताप, स्व.संतोष घाडगे यांच्यासह इतर कारसेवक हे राम मंदीराच्या संघर्षात सहभागी होते. माञ, आज राम मंदीराच्या सोहळ्यात दुर्दैवाने ते सहभागी नाहीत. परंतू त्यांच्या संघर्षांच्या आठवणींना आज कोपरगावकर उजाळा देत आहेत. हिंदूत्ववादी स्वयंसेवक, कारसेवकांनी संघर्ष केला म्हणुन त्यांच्या योगदानामुळे आज अयोध्येत प्रभूश्रीरामाचे मंदीर उभारले.
त्या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी केली जातेय. कारसेवकांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता व श्रेयवादात न पडता त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदीरा बरोबर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मंगलमय वातावरण निर्मित झाले आहे.
मनामनात श्रीरामाचा नारा आणि घराघरात राम उत्सव साजरा करण्याची तयारी सुरु झाली असली तरी ज्यांच्या त्याग व समर्पनामुळे हा दिवस तेजोमय होतोय म्हणून कोपरगावच्या कारसेवकांप्रती अनेकांनी ऋण व्यक्त केले. पुढील हजारो वर्षे अयोध्येतील श्रीरामाचे हे मंदीर मानवजातीला प्रेरणा देणारे राहील अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.