तालुक्यात चार साखर कारखाने असून, शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड नाही

शेवगाव प्रतिनिधी, दि.२० :  तालुक्याच्या २० किलोमीटर पंचक्रोशीत तब्बल चार साखर कारखाने असूनही स्थानिकांच्या ऊस तोडण्यासाठी मजूराच्या   टोळ्या मिळत नसल्याने येथील उस उत्पादक मेटाकुटीला आला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रीतसर दुसाच्या लागवडीची नोंद करूनही तो वेळेत तोडला जात नाही. शेवगाव तालुक्यात यंदा पावसाची अवकृपा झाल्याने येथे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणी पातळी घटली असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्या अभावी ऊसाची चिपाटे होत असल्याने त्या उसाला तोड मिळावी म्हणून शेतकरी कारखना कार्यालयाकडे हेलपाटे घालत आहेत. मात्र, मजूरांची टोळी उपलब्ध नसल्याचे कारण देत टोलवाटोलवी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

यासंदर्भात आपल्या कार्यक्षेत्रा ऐवजी बाहेरचा ऊस ‘गेटकेन’ पद्धतीने गाळप होत असल्याने परिसरातील चारही कारखाने जोमात चालु आहेत. तरी या साखर कारखान्यांनी गेट केन ऊस बंद करून आपापल्या गटात ऊस तोड कामगारांच्या टोळ्या वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी संबंधित साखर कारखाना प्रशासनास दिले आहे.