कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ :- श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती, समस्त कोपरगाव व सकल हिंदू समाजाच्या वतीने अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गोदातीरावर उपस्थित असलेल्या तमाम श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत सोमवार (दि.२२) रोजी आ. आशुतोष काळे यांनी चैताली काळे यांच्या समवेत सपत्नीक कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी मातेची महाआरती केली.
कोपरगाव शहरात प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सोमवार (दि.२२) रोजी सायंकाळी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती, समस्त कोपरगाव व सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भजनसंध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बँड शो त्याचबरोबर पवित्र गोदावरी नदीकाठी गंगा गोदावरी मातेच्या महाआरती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमामध्ये आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी चैताली काळे यांनी सहभाग घेवून पवित्र गोदावरी मातेची महाआरती केली.
तसेच एक शाम, रामजी के नाम या भजन संध्या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांच्या भजन श्रवणाचा आनंद घेतला. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करून नागरिकांना श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या चैताली काळे यांनी श्रीराम दीप लावले. सर्वत्र श्रीराम दीपांची रोषणाई, श्रीराम भक्तांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला उत्साह, कोपरगाव शहरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई, श्रीराम भक्तांच्या डोक्यावर असलेली भगवी टोपी व गळ्यातील भगव्या उपरणे व सर्वत्र होत असलेला जय श्रीरामचा जयघोष त्यामुळे सर्वत्र श्रीराममय वातावरण होवून कोपरगाव नगरीला प्रतीअयोध्येचे स्वरूप प्राप्त झाले होते.